तांबीवर ‘माळीण’ची छाया
By Admin | Published: September 1, 2014 10:24 PM2014-09-01T22:24:37+5:302014-09-01T23:06:22+5:30
जीविताला धोका : ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सातारा : सातारा तालुक्यातील तांबी या गावात जमीन खचली असून, झाडांच्या मुळांची माती सुटली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीविताला धोका असून, माळीण गावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, असे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
तांबी हे कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावठाण आहे.या गावाला आलवडी-धावली ग्रुप ग्रामपंचायत असून, ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसूल केली जाते. तथापि, ग्रामस्थांच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण केल्या जात नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. या गावाच्या खालच्या बाजूने रस्ता करण्यात आला आहे. तेथे खोल दरी व ग्रामस्थांच्या मालकीची जमीन आहे. यंदाच्या पावसाळ्यात ही जमीन खचली असून झाडांच्या मुळांची माती सुटली असल्याने धोका निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
१९६३ मध्ये या गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते. पन्नास वर्षे पूर्ण होऊनही ग्रामस्थांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. गावच्या वाघजाई महाकाली देवीच्या यात्रेला महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक जमतात.
देवस्थानची २७०० एकर जमीन कसबे तांबी (ता. जावली) येथे होती; मात्र सातारा तालुक्यात एक गुंठाही जागा मिळाली नाही. या सर्व बाबींवर योग्य विचार करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
खडतर जीवन
तांबी गावात एकूण बावीस घरे असून, लोकसंख्या शंभरच्या आसपास आहे. गवा, रानडुकरे यांसारख्या वन्यजीवांकडून शेतीचे नुकसान होत आहे. अतिपाऊस आणि वन्यजीवांमुळे शेती करता येत नसल्याने गावातील तरुण मुंबई-पुण्याला जाऊन उदरनिर्वाह करतात. आता जमीन खचल्याने नवेच संकट उभे राहिले असून, त्यामुळे ग्रामस्थ हादरून गेले आहेत.