सातारा जिल्ह्यात दुष्काळाची छाया; कोयना, महाबळेश्वरला ४०० मिलीमीटर पर्जन्यमानाची तूट
By नितीन काळेल | Published: August 30, 2023 12:50 PM2023-08-30T12:50:12+5:302023-08-30T12:50:45+5:30
कोयनेत यंदा १७ टीएमसी पाणीसाठा कमी
सातारा : जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा पर्जन्यमान कमी असून अतिवृष्टीच्या कोयना आणि महाबळेश्वरमध्येही यंदा ४०० मिलीमीटरची तूट आहे. तर नवजा येथेच अधिक पाऊस पडलेला आहे. त्याचबरोबर कोयना धरणातील पाणीसाठा ८६ टीएमसीवर असलातरी गतवर्षीपेक्षा १७ टीएमसीने कमी आहे. सध्या कमी पर्जन्यमानाने जिल्ह्यात दुष्काळाची गडद छाया आहे.
जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनचे आगमन होते. त्यामुळे जूनच्या शेवटपर्यंत खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात येते. यंदा मात्र, मान्सूनलाच उशिर झाला. त्यातच जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरुवात झाली. पण, हा पाऊस पूर्वेकडे कमी प्रमाणात झाला. तर पश्चिम भागात जुलै अखेरपर्यंत दमदार बरसला.
मात्र, यंदा गतवर्षीपेक्षा पर्जन्यमान कमी राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे राज्य शासन तसेच जिल्हा पताळीवरही प्रशासनानेही हालचाली सुरू केलेल्या आहेत.