शोध पाठच्या सावल्यांचा, खऱ्या शिवरायांचा!
By admin | Published: December 27, 2015 11:48 PM2015-12-27T23:48:51+5:302015-12-28T00:37:26+5:30
समर्थ एकांकिका स्पर्धा : पहिल्या दिवशी सात दर्जेदार एकांकिकांचे सादरीकरण; रसिकांना मेजवानी
राजीव मुळ्ये --सातारा समर्थ करंडक एकांकिका स्पर्धेचा पहिला दिवस गाजविला ‘सावल्या’ आणि ‘शोधला शिवाजी तर...’ या दोन एकांकिकांनी. याखेरीज पुण्याची ‘बे एके एक’ ही एकांकिका उत्कृष्ट सादरीकरणामुळे लक्षवेधी ठरली, तर दोन बालनाट्यांच्या माध्यमातून चिमुकल्यांच्या अभिनयकौशल्याचा रसिकांनी भरभरून आनंद घेतला. पहिल्या दिवशी सात एकांकिका सादर झाल्या. सादरीकरणाबरोबरच तांत्रिक अंगांनीही प्रायोगिक रंगभूमी अधिकाधिक समृद्ध होत असल्याची खात्री पटविणाऱ्या या एकांकिका होत्या.
यूथ थिएटर या साताऱ्याच्या संघाने सादर केलेली ‘सावल्या’ ही चेतन दातार यांच्या नाटकावर आधारित एकांकिका अभिजात पठडीतली. किरण पवार या दिग्दर्शकाने नाटकाची एकांकिका करण्याचं शिवधनुष्य उचललं आणि पेललंही. चार स्त्रियांचं, पुरुषविरहित, परिस्थिती जेमतेम असलेलं आणि भूतकाळाच्या सावल्या सोबत बाळगून उभं राहू पाहणारं एक घर. तीन बहिणी. एक वयात आलेली, एक येऊ घातलेली आणि एक लग्नाचं वय उलटून गेलेली प्रौढ. वडिलांनी ‘दुसरी’ शोधली आणि आई निर्मलनं आत्महत्या केली, तेव्हापासून घरावर आजीची मायाळू सावली अन् घरात निर्मलची; कारण भूतकाळ ज्यांना टक्क आठवतो, त्यांना निर्मल ‘भेटते’. ज्यांना आठवत नाही त्यांच्यावर ‘लक्ष ठेवते’; पण करू काहीच शकत नाही.
एका अमूर्त पात्राचा देहरूपानं रंगमंचावरील वावर नीलिमा कमानी यांनी चपखल वठविला. तीनही बहिणींच्या वयसुलभ स्वप्नांची वाटचाल, त्या स्वप्नांचा वापर करू पाहणाऱ्या ‘अनुल्लेखनीय’ व्यक्ती, स्वप्नाची लाट फुटण्यापूर्वीची आणि नंतरची अवस्था, स्वप्नामुळं आलेली अधीरता आणि स्वप्नभंगानंतरची बधीरता, जोडतोडी आणि तडजोडी या साऱ्या गोष्टी राणी भोसले, धनश्री जगताप आणि स्रेहा धडवाई यांच्या अभिनयामुळं प्रेक्षकांना दिसत, जाणवत राहिल्या. हे सगळं घडताना कुठेही प्रवाह खंडित होणार नाही, याची काळजी किरण पवार यांनी घेतली. नाटकाचा अर्क एकांकिकेत सामावताना कुठे निवेदनशैली, कुठे सूचक आकृतिबंधांचा वापर केला. रत्नागिरीहून नातींसाठी आलेली आणि निर्मलाच्या कुशीत विसावणारी आजी पुष्पा कदम यांनी ताकदीने उभी केली.
‘शोधला शिवाजी तर...’ ही डॉ. भार्गवप्रसाद लिखित, दिग्दर्शित एकांकिका सातारच्या निर्मिती नाट्यसंस्थेनं सादर केली. शिवपुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पावसामुळं रद्द झाल्यानंतर एका शाळेच्या इमारतीत सक्तीनं आसरा घ्यावा लागलेला उदयोन्मुख शिवभक्त युवा नेता, एक स्त्री, एक लेखक आणि त्यांना ‘सर्व्हिस’ देणारा हॉटेलातला पोऱ्या अशी प्रसंग आणि पात्ररचना. पोऱ्याचा धर्म आणि स्त्रीचा व्यवसाय समजल्यानंतर विनाकारण त्यांचा तिटकारा करणारा युवा नेता भुजंगराव पंकज काळे यांनी मस्त वठविला. प्रसंगानुरूप उडणारे खटके, त्यासाठी उद्भवलेली परिस्थिती आणि तशा परिस्थितीत शिवरायांनी त्याकाळी घेतलेली भूमिका सांगण्याची जबाबदारी लेखकावर. ही भूमिकाही पंकज काळे यांनी चांगली पेलली. मंगेश गायकवाडचा वेटरही उत्तम. संवेदनशील विषयावर नेमकं भाष्य करून परिणाम साधण्याच्या कसोटीवर एकांकिका खरी उतरली.
संधी पुणे निर्मित, सिद्धार्थ पुराणिक लिखित, चिन्मय बेरी दिग्दर्शित ‘क्रमश:’मध्ये बाँबस्फोटानंतरचा घटनाक्रम आणि संकटकाळी एकत्र आलेल्या मित्रांची कथा चितारली आहे. पोलिसांपासून पीडितांपर्यंत सर्वांची हतबलता आणि त्यातून उभ्या राहणाऱ्या नव्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक घट्ट होत जाणारी मैत्री श्रेयस माडीवाले आणि सुमेध कुलकर्णी यांनी छान साकारली.
लहानग्यांची धमाल...
पहिल्या दिवशी सादर झालेल्या दोन बालनाट्यांमध्ये लहानग्यांनी अभिनयाची चुणूक दाखविली. दीपलक्ष्मी सांस्कृतिक प्रतिष्ठानची ‘डम डम डंबोला’ टीव्हीवरच्या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून वंचित मुलांच्या स्वप्नांवर भाष्य करणारी, तर ‘खेळ मांडियेला’ ही लोकमंगल शाळेच्या मुलांनी सादर केलेली अभिजित वाईकर लिखित, मुजीब बागवान दिग्दर्शित एकांकिका साध्या-साध्या प्रसंगांमधून मोठ्यांना लहानपणात घेऊन जाणारी. वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा आणि लहानग्यांनी केलेली धमाल प्रेक्षकांना मजा देऊन गेली.