शहापूरचा पाणीपुरवठा शनिवारी राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:39 AM2021-03-05T04:39:25+5:302021-03-05T04:39:25+5:30
सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर योजनेच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम शुक्रवार व शनिवारी पाणीपुरवठा विभागाकडून ...
सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर योजनेच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम शुक्रवार व शनिवारी पाणीपुरवठा विभागाकडून केले जाणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि. ६) शहापूरचा सकाळ व दुपारच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. कास योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती काढण्याचे काम नुकतेच पूर्णत्वास आले. आता शहापूर योजनेच्या पाणीपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून शुक्रवार व शनिवारी हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी २४ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि. ६) शहापूर योजनेचा सकाळ व दुपारच्या सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी केले आहे.