शहीद धनावडेंच्या मुलांचा शिक्षण खर्च उचलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:02 PM2017-08-27T23:02:58+5:302017-08-27T23:03:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : ‘शहीद जवान रवींद्र धनावडे यांच्या कुटुंबीयाच्या दु:खात आपण सहभागी आहोत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी शासन उचलणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक मदतीबरोबरच पुढील कोणत्याही अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासन कटीबध्द आहे,’ अशी ग्वाही राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या हिंदू स्मशानभूमी व सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर पालिका सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, प्रांताधिकारी अस्मीता मोरे, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, नगरसेवक किसन शिंदे, भाजप प्रवक्ते भरत पाटील, भाजपा जिल्हा प्रमुख विक्रम पावस्कर, सरचिटणीस रवींद्र कुंभारदरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद जवान रवींद्र धनावडे व स्वातंत्र्यसैनिक दिवंगत भि. दा. भिलारे (गुरूजी) यांना उपस्थित मान्यवरांकडून श्रध्दांजली वाहण्यात आली. यानंतर मंत्री पाटील म्हणाले, ‘महाबळेश्वरात स्मशानभूमीच्या रूपाने अत्यंत सुंदर व देखणी वास्तू उभी राहिली आहे. ही स्मशान भूमी भविष्यात एक पर्यटनस्थळ म्हणून लौकिक मिळवेल. ते म्हणाले, सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची गरज भासू लागली आहे. आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवत आहे. ही भीती येथे आलेल्या प्रत्येकाला वाटली पाहिजे. पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे पालिकेसह पोलिसांचेही काम सोपे होणार आहे.
महाबळेश्वरमधील रस्ते खड्डेमय झाले असून, पावसाळा संपताच सर्व रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग व मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा सुरूर-पोलादपूर या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव तयार करण्याचेही आदेश दिले आहेत,’ असेही ते म्हणाले.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या बाजीराव शेलार, कोमल प्रभाळे, कल्याणी शिंत्रे व शब्बीर नालबंद या प्राध्यापकांचा सत्कार मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अनुदान वाटप व महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटनही मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. नगरसेवक कुमार शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी अविनाश शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, माजी सभापती अमित कदम, नगरसेवक धनंजय जांभळे, अॅड. संजय जंगम, जीवन महाबळेश्वरकर, मधुकर साळुंखे, विशाल तोष्णीवाल, प्रदीप कात्रट, राजेंद्र पुजारी, शरद बावळेकर, महादेव जाधव उपस्थित होते.