शहीद जवान मोहिते यांना साश्रूनयनांनी निरोप

By admin | Published: March 23, 2015 12:15 AM2015-03-23T00:15:33+5:302015-03-23T00:42:48+5:30

हजारोंची उपस्थिती : वाईच्या कृष्णातीरी अंत्यसंस्कार

Shaheed Jawan Mohite's message to the departed souls | शहीद जवान मोहिते यांना साश्रूनयनांनी निरोप

शहीद जवान मोहिते यांना साश्रूनयनांनी निरोप

Next

वाई : ‘शहीद जवान सूरज मोहिते अमर रहे’, ‘जब तक सूरज-चाँद रहेगा... सूरज तेरा नाम अमर रहेगा’, ‘भारतमाता की जय’ अशा घोषणांनी धीरगंभीर बनलेल्या वातावरणात शहीद जवान सूरज सर्जेराव मोहिते रविवारी अनंतात विलीन झाले. हजारोंच्या जनसमुदायाने त्यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. वाईच्या कृष्णातीरी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले होते. सूरज मोहिते यांच्या कुटुंबीयासह वाई तालुक्यातील नागरिक दोन दिवसांपासून पार्थिवाच्या प्रतीक्षेत होते़ जवान मोहिते यांचे मूळ गाव गणेशवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे रविवारी सकाळी काही काळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. तेथील ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर वाई येथे दुपारी बारा वाजता सिद्धनाथवाडीच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय अंत्यदर्शनासाठी जमला होता. पार्थिवाचे आगमन होताच त्यांच्या आई, बहीण, भाऊ, चुलते व नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता़ त्यानंतर नागरिकांना अंत्यदर्शन घेता यावे म्हणून तयार करण्यात आलेल्या खास मंडपात पार्थिव ठेवण्यात आले़.नागरिकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर फुलांनी सजविलेल्या वाहनातून दुपारी एक वाजता हजारो नागरिकांच्या उपस्थितीत, शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा अंबाबाई मंदिर, महागणपती पुलावरून चित्रा टॉकीजमार्गे किसनवीर चौकातून पंचायत समितीमार्गे सिद्धनाथवाडीच्या स्मशानभूमीत आली. तेथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली़ जिल्हा पोलीस दलाच्या वतीनेही तीन फैरींची सलामी देण्यात आली़ ‘सीआरपीएफ’च्या पुणे विभागाचे महानिरीक्षक सुशीलकुमार पर्थ, डेप्युटी कंमाडर तरुणकुमार सोलंकी, असिस्टंट कंमाडर दिनेश चंद्रा यांच्यासह पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील, नाशिकच्या आमदार देवयानी फरादे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ़ अभिनव देशमुख, प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस उपाधीक्षक दीपक हुंबरे, तहसीलदार सदाशिव पडदुणे, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, मुख्याधिकारी आशा राऊत, नगराध्यक्ष भूषण गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात, नीलिमा खरात, शिवसेनेचे डी. एम. बावळेकर, जिल्हा उपप्रमुख प्रदीप माने, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, पंचायत समिती सभापती उमा बुलुंगे, माजी सभापती विजयसिंह नायकवडी, भाजपचे पुरुषोत्तम जाधव, भाजप प्रदेश सदस्य अविनाश फरांदे, तालुकाध्यक्ष मनोज कदम, नगरसेवक दत्तात्रय खरात, अनिल सावंत, प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजया भोसले, आनंद कोल्हापुरे, काशिनाथ शेलार, प्रदीप जायगुडे, शंकर वाघ यांच्यासह अनेक मान्यवर नागरिकांनी पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली़ त्यानंतर मोहिते यांचे थोरले बंधू जीवन सर्जेराव मोहिते यांनी अग्निसंस्कार केले. (प्रतिनिधी)


गुरुवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी सूरज यांच्यासह तेरा जवान घटनास्थळी होते. हल्ल्याची चाहूल सर्वप्रथम सूरज यांना लागली. त्यांनी प्रत्युत्तर देऊन एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. त्यामुळे उर्वरित जवानांचे प्राण वाचले़ या अतिरेक्याला वेळीच प्रत्युत्तर दिले नसते, तर मोठा अनर्थ घडला असता़
- सुनीलकुमार पर्थ,
महानिरीक्षक, ‘सीआरपीएफ’

वाई येथे कृष्णातीरावर रविवारी जवान सूरज मोहिते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दल व जिल्हा पोलीस
दलातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली़

Web Title: Shaheed Jawan Mohite's message to the departed souls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.