शाहूपुरीत माजी सरपंचांकडून धक्का

By admin | Published: May 21, 2017 01:03 AM2017-05-21T01:03:56+5:302017-05-21T01:03:56+5:30

सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग : भाजपकडून नाराजांना आॅफर

Shahpurkar push past patrols | शाहूपुरीत माजी सरपंचांकडून धक्का

शाहूपुरीत माजी सरपंचांकडून धक्का

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी काळभैरवनाथ पॅनेलला याच आघाडीकडून सरपंच बनलेल्या रेश्मा गिरीगोसावी यांनी जोरदार धक्का दिला आहे. पॅनेलला रामराम ठोकत त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने शाहूपुरीतल्या अंतर्गत राजकारणाचे प्रतिबिंब लोकांपुढे आले आहे.
शाहूपुरी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरु आहे. १७ जागांसाठी २७ मे रोजी मतदान घेतले जाणार आहे. निवडणुकीला आठवडा उरला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील काळभैरवनाथ पॅनेल, भारत भोसले यांच्या नेतृत्वाखालील शाहूपुरी विकास आघाडी व भारतीय जनता पार्टीचे पॅनेल अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
काळभैरवनाथ व शाहूपुरी विकास आघाडी या दोन्ही पॅनेलने १७ जागांवर उमेदवार उभे केलेत. भाजपने १२ जागांवर उमेदवार उभे केले.
दरम्यान, माजी सरपंच रेश्मा गिरीगोसावी यांनी काळभैरवनाथ पॅनेलला रामराम ठोकत अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने शाहूपुरीत जोरदार चर्चा सुरु आहे. काळभैरवचे पॅनेलप्रमुख संजय पाटील यांच्याशी विकास कामांच्या श्रेयवादातून त्यांचे बिनसले असल्याची जोरदार चर्चा आहे. सरपंचच बाजूला गेल्या असल्याने काळभैरवनाथ पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. अनिता जांभळे, मिलींद चव्हाण, अ‍ॅड. योगेश साळुंखे या संजय पाटील यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनीही त्यांच्याशी फारकत घेतली आहे.
दुसऱ्या बाजूला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणारा भारत भोसले यांच्यासह, सतीश सूर्यवंशी, चंदन जाधव यांनी आमदार गटातर्फे काम सुरु केले आहे.
मानस मित्र समूहाचे निलेश धनावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे, ही मंडळी एकवटण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करु, असे धनावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
तिसरीकडे भारतीय जनता पक्षातर्फे मागील पंचायत समिती निवडणूक लढलेले रामदास धुमाळ संजय पाटील यांच्यासोबत प्रचारात आहेत. काळभैरवच्या फ्लेक्सवर त्यांचे फोटो झळकले आहेत. भाजपला ऐनवेळी याठिकाणी नेतृत्व बदल करुन संजय लेवे यांच्या खांद्यावर जबाबदारी द्यावी लागली आहे.


नेत्यांच्या हालचाली पडद्यामागून
शहराजवळची मोठी ग्रामपंचायत असलेल्या शाहूपुरी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली असताना खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या हालचाली पडद्यामागून सुरु आहेत. सातारा शहराच्या हद्दवाढीची अधिसूचना जारी झाली असल्याने २७ मे पर्यंत काय होईल?, हे कोणीही सांगू शकत नाही. खासदार व आमदारांच्या गटांकडून शहराच्या हद्दवाढीवरुन जोरदार श्रेयवाद सुरु आहे. या परिस्थितीत नेते पुढे येणार का? हा प्रश्न शाहूपुरीवासियांना पडला आहे. पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवाराला चांगली मते पडली असल्याने त्यांनीही बळ धरले आहे.

Web Title: Shahpurkar push past patrols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.