‘शाहूपुरी’त उदयनराजे समर्थकांचीच सत्ता!
By admin | Published: May 29, 2017 11:03 PM2017-05-29T23:03:30+5:302017-05-29T23:03:30+5:30
‘शाहूपुरी’त उदयनराजे समर्थकांचीच सत्ता!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या येथील शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील काळभैरवनाथ पॅनेलने ११ जागा जिंकत सत्ता मिळविली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक भारत भोसले यांच्या शाहूपुरी विकास आघाडीने ६ जागांवर विजय मिळविला.
या निवडणुकीत १७ जागांसाठी ५४ उमेदवारांनी नशीब आजमावले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयामध्ये सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी झाली. या निवडणुकीतील निकाल धक्कादायक तर लागलेच, परंतु केवळ ५० ते १०० मतांच्या फरकाने बहुतांश उमेदवार निवडून आले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष करीत गुलालाची उधळण केली.
काळभैरवनाथ पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते : रमेश धुमाळ (६८८), राजू गिरीगोसावी (१३५३), धनश्री ग्रामोपाध्ये (८२९). मुग्धा पुरोहित (७४१), अमृता प्रभाळे (३३७), मयुरा कुलकर्णी (५६९), सुधाकर यादव (८४७), लिलाबाई शितोळे (९३८), गणेश आर्डे (६४०), शंकर किर्दत (८२३), लता राजपुरे (७१२).
शाहूपुरी ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते : राजेंद्र मोहिते (६२४), माधवी शेटे (६00), नवनाथ जाधव (६८३), शोभा राजेंद केंडे (८0८), सुहास वहाळकर (४0८), निलम देशमुख (८0५).
भाजपचा धुव्वा
केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपने या निवडणुकीत १२ उमेदवार उभे केले होते. परंतु या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
फेरमतमोजणीची मागणी
वॉर्ड क्रमांक पाच मध्ये ग्रामविकास आघाडीच्या निलम देशमुख या ८०५ मते घेऊन विजयी झाल्या. तर त्यांच्या विरोधातील काळभैरव पॅनेलच्या उमेदवार आशा गुजर यांना ८०१ मते मिळाली. चार मतांचा फरक असल्याने गुजर यांच्यावतीने फेरमतमोजणी घेण्याची मागणी करण्यात आली; परंतु तरीही देशमुख यांनाच ४ मते जास्त मिळत असल्याने देशमुख यांना विजयी घोषित करण्यात आले.
राजेंद्र गिरीगोसावी यांना विक्रमी मते
काळभैरवनाथ पॅनेलचे राजेंद्र गिरीगोसावी यांनी विरोधातील तीन उमेदवारांचा पुरता धुव्वा उडवीत विक्रमी मतांनी विजय मिळविला आहे. त्यांना १३५३ मते मिळाली. जवळपास १००० इतक्या मतांनी ते निवडून आले आहेत. पंचायत समिती निवडणुकीत संजय पाटील हे ७०० मतांनी विजय ठरले होते. त्यापुढे पाऊल टाकत गिरीगोसावी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्या क्रमांकाच्या वॉर्डमधून १००० मतांचे मताधिक्क्य घेतले आहे.