‘जरंडेश्वर’साठी शालिनीताईंचा अठरा वर्षे लढा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:10+5:302021-07-02T04:27:10+5:30
कोरेगाव : थकीत कर्जापोटी राज्य सहकारी बँकेने जप्त केलेल्या चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर कारखान्याचा नाममात्र किमतीत लिलाव ...
कोरेगाव : थकीत कर्जापोटी राज्य सहकारी बँकेने जप्त केलेल्या चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर कारखान्याचा नाममात्र किमतीत लिलाव करून मुंबईच्या गुरू कमोडिटीज कंपनीला विकण्यात आला. बँकेने अन्यायकारक भूमिका घेत कारखाना आपल्याकडून हिसकावून घेतल्याचा आरोप करत कारखान्याच्या संस्थापिका माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी गेली १८ वर्षे अविरत लढा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखाना परत मिळवायचाच, असा चंग त्यांनी या वयातसुध्दा बांधला आहे.
डॉ. शालिनीताई पाटील यांनी कोरेगावसह खटाव तालुक्यात गावोगावी जाऊन भागभांडवल उभारत चिमणगावच्या माळावर साखर कारखाना उभा केला होता. कारखान्याच्या मंजुरीपासून लिलाव प्रक्रियेपर्यंत त्यांना प्रत्येक वेळी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखाना उभारणीस कर्ज देण्यास नकारघंटा वाजविल्याने त्यांनी राज्यातील इतर बँकांकडून कर्ज घेत कारखान्याची उभारणी केली, मात्र पहिल्याच गळीत हंगामापासून कारखाना विविध कारणांनी अडचणीत येत गेला. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी कारखान्याच्या मागची साडेसाती काही केल्या संपत नव्हती.
कारखान्यातील कामगारांसह अन्य जवळच्या लोकांच्या नावावर विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज उचलल्याने दरवर्षी कारखान्याची आर्थिक घडी विस्कळीत होत गेली. त्यातच कारखान्यातील कामगारांनी संघटना स्थापन केली. रायगड जिल्ह्यातील एका कामगार नेत्याने कारखान्यासाठी आंदोलन उभे केले आणि त्यातून कारखान्याचे दिवस फिरले. पश्चिम महाराष्ट्रात दोन व्हाईस चेअरमन असलेला हा एकमेव सहकारी साखर ठरला. आर्थिक अरिष्टात सापडल्यानंतर कारखाना चालविणे अवघड झाल्याने तो भाडेतत्त्वावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील मोठे साखर उद्योजक झुनझुनवाला यांनी काही काळ कारखाना चालविला, मात्र त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर सहकारातील सर्वात मोठ्या वारणा समूहाने काही काळ कारखाना चालविला, मात्र संचालक मंडळासह कामगारांच्या कुरबुरीमुळे त्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. त्यांच्यानंतर सिध्दार्थ समूहाने काही काळ कारखाना चालविण्याचा प्रयत्न केला, मात्र तेदेखील मधूनच व्यवस्थापन सोडून निघून गेले.
अखेरीस राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी कारखान्याचा लिलाव केला. या लिलाव प्रक्रियेत भुर्इंजच्या..................... किसन वीर साखर कारखान्याने सुरुवातीला भाग घेतला, मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यानंतर मुंबई स्थित गुरू कमोडिटीज कंपनीने कारखाना लिलावात विकत घेतला. या समूहाने मोठ्या प्रमाणावर कारखान्याचा विस्तार केला आहे. त्यांनी राज्यातील विविध सहकारी बँकांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलली आहेत. राज्य बँकेने राबविलेल्या लिलाव प्रक्रियेच्या विरोधात डॉ. शालिनीताई पाटील यांनी गेली १८ वर्षे लढा उभारला आहे. कोरेगावच्या स्थानिक न्यायालयापासून उच्च न्यायालय आणि अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीपर्यंत त्यांनी धाव घेतली आहे. आजही त्यांचा लढा कायम आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखाना शेतकऱ्यांच्या स्वमालकीचा करण्याचा त्यांचा या वयातही निर्धार कायम आहे.