शंभू महादेव भक्तांची सावली हरपली!
By admin | Published: January 18, 2016 09:15 PM2016-01-18T21:15:11+5:302016-01-18T23:34:04+5:30
शिखर शिंगणापूर : उमाबनातील बेसुमार वृक्षतोडीमुळे पाणीटंचाईचे सावट
दहिवडी : दुष्काळ, पाणी टंचाईचे सावट गडद होत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड आणि संगोपन गरजेचे ठरत असताना, शिखर शिंगणापूरमध्ये मात्र उमाबनात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. वृक्ष तोडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर समस्यांना आमंत्रण दिले जात आहे.
तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने शिखर शिंगणापूरला बारमाही भाविक येतात. शंभू महादेवाचे दर्शन घेऊन उमाबनातील झाडांच्या गडद सावलीत भाविक विश्रांती घेतात. दरवर्षीपेक्षा मागील पावसाळ्यात पडलेल्या पावसाळ्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
संपूर्ण राज्यात शेतकरी वर्ग दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेला असताना वृक्षराजी राखणे महत्त्वाचे ठरले आहे. एकीकडे शासन कोट्यवधींचा निधी वन संगोपनासाठी खर्ची घालत असताना दुसरीकडे शिखर शिंगणापूमध्ये या कार्यक्रमाला तिलांजली देण्याचे प्रकार पाहावयास मिळत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शिंगणापूर ग्रामपंचायतीत वनरक्षकच नसल्याने उमाबनातील झाडांची बेसुमार तोड होत आहे. वृक्षांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. राजरोसपणे चाललेली वृक्षतोड पाहूनही शिंगणापूर ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. उलट झाडे तोडणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसत आहे.
शिंगणापूर मधील उमाबन हे सुमारे शंभर ते दीडशे एकर क्षेत्रावर पसरले असून, यात्रेकरूंच्या सोयीसाठी व देवाला सोडलेल्या गायींना चरण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. फेरफंड कमिटी ही ग्रामपंचायतीच्या स्थापनेपूर्वी होती. त्या काळापासून उमाबन यात्रेकरूंसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली उमाबन आहे.
यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपरण, चिंच, कारंज अशा गडद सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड जाणीवपूर्वक करण्यात आली होती. या वृक्षांखाली वर्षानुवर्षे कावडी घेऊन येणारे यात्रेकरू थांबतात. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बांधीव दगडी विहिरीद्वारे करण्यात आली होती. ही दगडी विहीर सुस्थितीत आहे.
शिंगणापूरमध्ये चैत्र महिन्यात यात्रा भरते. ही यात्रा सर्वांत मोठी असते. ऐन उन्हाळ्यात यात्रा असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून येणाऱ्या यात्रेकरूंना उमाबनातील बहुवर्षीय, बहुपर्णी गडद सावली देणाऱ्या वृक्षांचा आधार वाटतो. याच वृक्षांची बेसुमार तोड होत आहे. संंबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक तोड सुरू ठेवली आहे.
राज्याच्या जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी नुकतीच येथे भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या झाडांची जोपासना करण्याबाबत मौलिक सूचना दिल्या होत्या; परंतु त्याची अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. याबाबत निसर्गप्रेमींनी ग्रामपंचायतीत प्रश्न मांडूनसुद्धा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
ही बेसुमार वृक्षतोड न थांबल्यास उमाबनाचा केवळ उल्लेखच राहील आणि ते कुठे होते याचा शोध घ्यावा लागेल. उमाबनात वृक्षसंवर्धन, वृक्षसंख्येत वाढ होऊन पर्यटन विकास व्हावा, यासाठी काही ठोस उपाययोजना करून पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज आहे.
शिंगणापूरचे शंभू महादेव हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे यात्राकाळात महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्यांना त्यांची हक्काची सावली मिळवून देण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे.
जलसंधारण खात्याकडून शिंगणापूर येथील ऐतिहासिक विहिरीतील गाळ काढणे, डागडुजी करणे आणि विहीर पुनरुज्जीवित केल्यास पाणी टंचाईवर मात करणे शक्य आहे. ग्रामपंचायतीने विहिरीची स्वच्छता प्रत्यक्षात सुरू केल्याबद्दल शिंगणापूर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीने
कुऱ्हाडबंदी करावी : मोरे
शिंगणापुरात उन्हाळ्यात यात्रा भरते. लाखोंच्या संख्येने भाविक येतात. उन्हाची तीव्रता कमी होण्यासाठी वृक्षतोड थांबविणे गरजेचे असून, वनसंवर्धनाची गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने कुऱ्हाडबंदी करावी,’ अशी मागणी जयकुमार मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
उमाबनात वीस वर्षांपूर्वी वृृक्षांची भरपूर संख्या होती. पर्जन्यमान चांगले होते. परंतु अलीकडच्या काळात बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या घटली आहे. निसर्गप्रेमी म्हणून मनावर मोठा आघात झाल्यासारखे वाटते.
- संजय बडवे
उमाबनात चाललेल्या बेसुमार वृक्षतोडीवर कारवाई होणे गरजेचे आहे. कायद्यात यासाठी तरतूद असून, त्याप्रमाणे अंमलबजावणी मात्र होत नाही. वृक्षांची जोपासना होऊन कत्तल थांबविली गेली पाहिजे.
- रवी वाघ