सातारा जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी चुरस, तिघांना संधी मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 04:49 PM2022-07-01T16:49:50+5:302022-07-01T17:18:51+5:30
भाजपची रणनीती पाहता पक्षाला जिल्ह्याचा ताबा घ्यायचा आहे
सातारा : राज्यात भाजप-शिवसेना (बंडखोर) युतीचे सरकार आले असून, आता जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या कोट्यातून माजी मंत्री शंभूराज देसाईंना लॉटरी लागणार असलीतरी भाजपमधून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे दावेदार आहेत. गोरे यांच्यामुळे माण तालुक्याला प्रथमच ‘मान’ मिळू शकतो.
राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्याचे नाव अधोरेखित आहे. या जिल्ह्याने महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने तीन मुख्यमंत्री दिले, तर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याने मुख्यमंत्रिपदाचा चौकार ठोकला आहे. तसेच जिल्ह्याची मंत्रिपदाची कमान सतत चढती राहिली. गेल्या काही वर्षांचा विचार करता जिल्ह्यात तरुण नेते उदयास आले. त्यांच्याकडे नेतृत्व तसेच कर्तृत्व असल्याचेही दिसले. यामुळे जिल्ह्यातील नेत्यांचा दबदबा विधिमंडळातही दिसून आला. जयकुमार गोरेंसारखे आमदार अनेक विषयांवर आवाज उठवत असतात.
जिल्ह्याचा मागील चार वर्षांचा विचार करता राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळले. काँग्रेसलाही गळती लागली. यातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी कमळ हातात घेतले. सद्यस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत, तर भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन व काँग्रेसचा एक आमदार आहे. भाजपची रणनीती पाहता पक्षाला जिल्ह्याचा ताबा घ्यायचा आहे.
त्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेकांना पक्षात घेऊन ताकद देण्याचे काम करण्यात आले. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे हे गेल्या काही वर्षात भाजपमध्ये गेले, तर त्यापूर्वी डॉ. अतुल भोसले यांनीही पक्षांतर केलेले. सद्यस्थितीचा विचार करता जिल्ह्यात भाजपच राष्ट्रवादीला आव्हान देऊ शकते, असे चित्र आहे. त्यातच शिवसेनेचा गट बरोबर येण्याने भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.
पावणेतीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे यांनी कमळ हाती घेतले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमारांना आमदार करा, मंत्रिपद मी देतो, असे लोकांना आश्वस्त केलेले. त्याचबरोबर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही मंत्रिपदाचे दावेदार आहेत. फडणवीस यांनीही त्यांना शब्द दिल्याचे सांगण्यात येते. यामुळे युती सरकार पुन्हा आल्याने भाजपमधून हे दोघे मंत्री असू शकतात.
शंभूराज देसाई कॅबिनेट मंत्री...
पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई हे महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडखोरी झाली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ते प्रथम गेले होते. त्यामुळे देसाई यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळू शकते, अशी शक्यता अधिक आहे.