राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद, मकरदआबांना लाल दिवा..
By नितीन काळेल | Published: October 4, 2023 07:11 PM2023-10-04T19:11:10+5:302023-10-04T19:13:06+5:30
अजितदादा गटाला पुन्हा साताऱ्याला बालेकिल्ला बनवायचाय
सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर २० वर्षांपासून वर्चस्व गाजवलेल्या राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला चार वर्षांत भगदाड पडत गेले. ताकद कमी झाली. आता पक्षात फूट असलीतरी अजितदादा गटाला पुन्हा साताऱ्याला बालेकिल्ला बनवायचे आहे. त्यामुळे नव्या राजकीय घडामोडीत दबावातून का असेना पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे घ्यायचे आहे. यातूनच आमदार मकरंद पाटील यांना लाल दिवा देण्याचे निश्चीत आहे. त्यामुळे सध्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडील पालकमंत्रिपद जाण्याचे संकेत आहेत.
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्याने यशवंतराव चव्हाण यांच्या रुपाने काॅंग्रेसवर भरभरून प्रेम केले. पण, १९९९ ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापना केली आणि जिल्हा पवार यांच्या पाठिशी ठामपणे राहिला. त्यावेळी विधानसभेचे १० पैकी ९ आमदार राष्ट्रवादी काॅंग्रेसचे झाले. त्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीच सबकुछ होती. पण, गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादीला हादरे बसले. त्यामुळे भाजपची ताकद वाढली.
सध्यस्थितीत राष्ट्रवादीतही दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांनी सातारा जिल्ह्यात ताकद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्ह्यावर कब्जा मिळवायचा आहे. यासाठी रणनिती आणि दबावाचे राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. त्यातूनच साताऱ्याचे पालकमंत्रीपदही हवे आहे. यासाठी स्वत: अजित पवार आग्रही आहेत. यासाठी अंतर्गत राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. पण, हे पद कोणाला द्यायचे असा प्रश्न असलातरी वाईचे आमदार मकरंद पाटील यांना लाॅटरी लागण्याचे संकेत आहेत.
आमदार मकरंद पाटील अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. वाई विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व आहे. मकरंद पाटील दादा समऱ्थक झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी अजित पवार भाजपबरोबर गेले त्यावेळीच मकरंद पाटील यांना मंत्रिपद देण्याचे निश्चीत होते. पण, त्यांनी तातडीने निर्णय न घेतल्याने मंत्रीपद रखडल्याचे सांगण्यात येते. पण, आज राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त आहे. ते मकरंद पाटील यांचेच असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात पाटील यांना लाल दिवा मिळणारच असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे पितृपंधरवडा झाल्यानंतर मकरंदआबाचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा होईल असे संकेत आहेत. त्यातूनच अजित पवार यांना साताऱ्याचे पालकमंत्रिपदही हवे आहे. या जागेवर मकरंद पाटील यांची वर्णी लागणार हे स्पष्ट आहे. यातूनच अजितदादा जिल्ह्यात पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
रामराजे-मकरंदआबांची जोडी...
राष्ट्रवादीतील फुटीनंतर जिल्ह्यात दोन गट झाले आहेत. अजितदादा गटात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण आदी आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीची जिल्ह्यातील कमान खासदार लक्ष्मणराव पाटील आणि रामराजेंनी सांभाळली. आता लक्ष्मणराव पाटील यांच्या पश्चात मकरंद पाटील हे रामराजेंच्याबरोबर आहेत. या दोघांवरच अजितदादा गट जिल्ह्यात मजबूत मोट बांधू पाहत आहे.
... तर माढा, सातारा लोकसभेला दोघांचे बंधू उमेदवार
राष्ट्रवादी काॅंग्रेस एकसंध होती तेव्हा सातारा लोकसभा मतदारसंघातून जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. नितीन पाटील हे मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. तर माढ्यातून रामराजे किंवा त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर हे उभे राहणार अशी अटकळ होती. पण, गेल्या तीन महिन्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्यात. महायुतीत माढा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास अजितदादा गटातून संजीवराजे दावेदार होऊ शकतात. सध्या त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद आहे. तर सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्यास नितीन पाटील उमेदवार असू शकतात.
पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व. (१९९५ पासून)
- हर्षवर्धन पाटील - काॅंग्रेस
- अजित पवार - राष्ट्रवादी
- दिलीप वळसे-पाटील राष्ट्रवादी
- जयंत पाटील - राष्ट्रवादी
- रामराजे नाईक-निंबाळकर - राष्ट्रवादी
- शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी
- विजय शिवतारे - शिवसेना
- बाळासाहेब पाटील- राष्ट्रवादी
- शंभूराज देसाई - शिवसेना (शिंदे गट)