सातारा पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे लक्ष केवळ मलिद्यावर - शिवेंद्रसिंहराजे भोसले : जुन्या आरटीओ रस्त्याची स्वखर्चातून केली दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 08:27 PM2018-08-30T20:27:32+5:302018-08-30T20:31:49+5:30
‘सातारा पालिकेचा कारभार सध्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे लोक कोणाकडून मलिदा मिळतोय, यावरच लक्ष ठेवून आहेत,’
सातारा : ‘सातारा पालिकेचा कारभार सध्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे लोक कोणाकडून मलिदा मिळतोय, यावरच लक्ष ठेवून आहेत,’ असा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी येथे केला.
शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पालिकेने रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने गुरुवारी सकाळी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ कार्यालय या रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे भरले. पालिका विकासकामांमध्ये अडवणूक करत असल्याचा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी केला.
सकाळी अकराच्या सुमारास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व इतर कार्यकर्ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात जमले. मुरूम व रोलरही यावेळी आणण्यात आला होता. आमदार भोसले यांनी स्वत: श्रमदान केले. मुरुमाच्या पाट्या खड्ड्यांमध्ये टाकण्यात आल्या. त्यानंतर रोलर फिरवून सपाटीकरण करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘जुना आरटीओ रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. हा रस्ता पालिकेच्या मालकीचा आहे. रस्ता दुरुस्त करण्यासाठी वेळोवेळी पालिकेला पत्र दिले. निवेदने सादर केली. तरीही पालिकेला जाग येत नाही. या रस्त्याचे काम आम्ही करतो, म्हटलं तरी पालिका ठराव करून देत नाही. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीचा निधी आणून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम केले जाणार होते. मात्र पालिका अडवणूक करत आहे. सत्तारुढ आघाडी कमी पडेल, या मानसिकतेतून विकासकामांना खीळ घातली जात आहे.’
साशा कंपनीची बिले आणि त्यातून मिळणाऱ्या मलिद्यावरच सत्ताधाºयांचे लक्ष आहे. हा मलिदा कोणाकडे जातोय, एवढेच सत्ताधारी पाहत बसलेले असतात, अशी टीकाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
दरम्यान, कार्यकर्त्यांनी श्रमदान करून खड्डे भरले. या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले होते. ते भरले गेल्याने वाहनधारक, प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. आम्ही खड्डे मुजविले आहेत, यातून बोध घेऊन नगरपालिकेने शहरातील रस्त्यांचे खड्डे मुजवावेत. या कामालाही नगरपालिका अडविण्याचे प्रयत्न करेल. आमच्यामुळे पालिकेचा खर्च कमी झाला आहे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.
बहुमताची सत्ता अडवणुकीसाठी
शहरात कोणतेही विकासकाम करायचे झाल्यास नगरपालिकेचा ठराव घ्यावा लागतो. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध होणार होता; परंतु पालिका अडणूक करत आहे. बहुमताच्या जोरावर विकासकामे अडविण्याचे चुकीचे काम सातारा विकास आघाडीकडून सुरू आहे, अशी टीकाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.