कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणात ‘रयत’ने घेतलेली भूमिका महत्त्वाची, शरद पवार यांनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 08:23 PM2021-09-22T20:23:00+5:302021-09-22T20:39:12+5:30
Sharad Pawar: कोरोनासारख्या विषाणूमुळे संपूर्ण जगावर मोठे संकट आले आहे. अशा कालखंडात रयत शिक्षण संस्थेने ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन अध्यापनासाठी संस्थेतील सर्व अधिकारी आणि शिक्षकांनी घेतलेली भूमिका महत्वाची आहे.
सातारा - कोरोनासारख्या विषाणूमुळे संपूर्ण जगावर मोठे संकट आले आहे. अशा कालखंडात रयत शिक्षण संस्थेने ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन अध्यापनासाठी संस्थेतील सर्व अधिकारी आणि शिक्षकांनी घेतलेली भूमिका महत्वाची आहे. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही ही गोष्ट रयत शिक्षण संस्थेच्या शंभर वर्षाच्या लौकिकाला साजेशी बाब आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे इतर सर्व मान्यवर सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंबर ,लाईफ वर्कर कार्यकर्ते, रयत सेवक उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी ऑनलाईन अध्यापनाच्या बाबतीत केलेल्या कार्याचे कौतुक करून पवार म्हणाले, ‘कोविड १९ सारख्या विषाणूमुळे जगामध्ये सर्वच क्षेत्रात एक प्रकारची नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. अशा कालखंडात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाईल यासारखी साधनांची कमतरता असतानाही ‘रोझ’ प्रकल्प राबवून शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श संस्थेने निर्माण केला आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून संस्थेने रोज अडीच लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण ऑनलाईनच्या माध्यमातून आपण पोहोचवू शकलो ही समाधानाची बाब असल्याचे पवार म्हणाले.
दरम्यान, सकाळी कर्मवीर समाधीला संस्थेचे उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड, माध्यमिक विभागाचे सहसचिव संजय नागपुरे संस्थेचे ऑडिटर डॉ. शिवलिंग मेनकुदळे, मध्य विभागाचे विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे संस्थेचे कायदा सल्लागार अॅड. दिलावर मुल्ला व संस्थेचे समन्वयक डी. एस. सूर्यवंशी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कर्मवीर समाधीस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी केले. उपस्थितांच्या बद्दलची कृतज्ञता संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी व्यक्त केली.
कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माऊली राष्ट्रीय पुरस्कार देशमुख आणि पोपरे यांना जाहीर
कर्मवीर जयंतीच्या ऑनलाइन कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार आणि रयत माउली लक्ष्मीबाई पाटील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. २०२० चे पुरस्कार शरद पवार यांनी आज केले. यामध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार दिवंगत गणपतराव देशमुख यांना जाहीर करण्यात आला. रयत माउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यामध्ये अत्यंत उल्लेखनीय अशा स्वरूपाचे सामाजिक कार्य करणाऱ्या बीजमाता राहिबाई सोमा पोपरे यांना जाहीर करण्यात आला अडीच लाख रुपये रोख मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.