साताऱ्यात उद्या शरद पवार, फडणवीसांची तोफ धडाडणार
By नितीन काळेल | Published: May 3, 2024 06:55 PM2024-05-03T18:55:32+5:302024-05-03T18:56:20+5:30
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात असून महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे ...
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात असून महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातारा शहरात सभा होणार आहे. या सभेतून दोघे कोणती तोफ डागणार आणि काय आवाहन करणार याकडे मतदारसंघाचे लक्ष असणार आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण १६ उमेदवार रणांगणात आहेत. ही निवडणूक प्रामुख्याने भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यातच होत आहे. या निवडणुकीमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातूनही जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. तसेच प्रचारालाही गती देण्यात आलेली आहे.
तसेच आतापर्यंत दोन्हीही उमेदवारांसाठी राज्य तसेच राष्ट्रीय पातवळीवरील नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. सध्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असून अजूनही मोठ्या सभा घेण्याचा धडाका सुरूच आहे. यामुळेच शनिवारी साताऱ्यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे.
शनिवार, दि. ४ मे रोजी सायंकाळी पाचला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साताऱ्यातील तालीम संघ मैदानावर सभा होत आहे. महायुती उमेदवार व खासदार उदयनराजेंसाठी ही सभा असणार आहे. तर सायंकाळी सहाच्या सुमारास साताऱ्यातीलच जिल्हा परिषद मैदानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेणार आहेत. दोन्हीही सभा एकाचवेळी होणार असल्याने दोघे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.