न्यू फलटण शुगर वर्क्सला आर्थिक संकटातून बाहेर काढू : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:18 AM2018-04-17T00:18:08+5:302018-04-17T00:18:08+5:30
फलटण : ‘न्यू फलटण शुगर वर्क्स लि., साखरवाडी साखर कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आगामी काही दिवसांत बैठकीचे आयोजन करून तोडगा काढला जाईल,’
फलटण : ‘न्यू फलटण शुगर वर्क्स लि., साखरवाडी साखर कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आगामी काही दिवसांत बैठकीचे आयोजन करून तोडगा काढला जाईल,’ आश्वासन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी कारखान्याचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांना दिले.
न्यू फलटण शुगर वर्क्सने यावर्षीच्या हंगामात गाळप केलेल्या उसाच्या बिलाबाबत अस्थिरता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांनी गोविंद बाग, बारामती येथे खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली.
या हंगामात २ लाख ८५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, दि. १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान गाळपास आलेल्या उसाचे प्रतिटन २ हजार ६५० रुपयांप्रमाणे बिल अदा केले आहे. मात्र त्यानंतरच्या उसाचे पेमेंट अद्याप झाले नसल्याने या कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.
योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन
साखरेच्या दरातील घसरण व अन्य अडचणीमुळे कारखाना आर्थिक संकटात सापडला असल्याने इच्छा असूनही यावर्षी ऊस उत्पादकांना त्यांच्या उसाचे बिल वेळेवर देऊ न शकल्याने कारखान्याचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी खासदार शरद पवार दिल्लीस जाणार असल्याने तेथून परतल्यानंतर आगामी दोन दिवसांत मुंबईत बैठक घेऊन यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांना दिले आहे.