Satara: राजकीय पोस्ट, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला पोलिसांची मारहाण; पुसेगाव पोलिस ठाण्यासमोर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 12:15 PM2024-11-07T12:15:57+5:302024-11-07T12:16:58+5:30
कारवाईचे पोलिस अधीक्षकांचे आश्वासन
पुसेगाव : डिस्कळ, ता. खटाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका कार्यकर्त्याने समाजमाध्यमावर राजकीय भूमिकेतून पोस्ट टाकली. या प्रकारानंतर पुसेगाव पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात नेऊन मारहाण केल्याचा आरोप करत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुसेगाव पोलिस ठाण्याच्या आवारात बुधवारी सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
निवडणूक आयोगाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी केली. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते पुसेगाव पोलिस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
यावेळी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकरणाची चाैकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार पुसेगाव पोलिस प्रशासन कार्यवाही करत आहे. यात दुजाभाव केला जात नाही व केला जाणार नाही. विविध नेतेमंडळी, कार्यकर्ते व नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. - संदीप पोमण- सहायक पोलिस निरीक्षक, पुसेगाव पोलिस ठाणे