साताऱ्याच्या राजकारणावरील शरद पवारांचा प्रभाव संपेल - केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:19 PM2022-08-30T12:19:29+5:302022-08-30T12:35:32+5:30

काँग्रेस नेस्तानबूत झाली असून इतर प्रादेशिक पक्षही संपतील आणि भाजपचा प्रभाव वाढत जाईल

Sharad Pawar influence on Satara politics will end, says Union Minister of State Som Prakash | साताऱ्याच्या राजकारणावरील शरद पवारांचा प्रभाव संपेल - केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश

साताऱ्याच्या राजकारणावरील शरद पवारांचा प्रभाव संपेल - केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश

Next

सातारा : राजकारण बदलत आहे, त्याप्रमाणे राजकारणावरील व्यक्तींचे प्रभावही बदलत जातात. सातारा जिल्ह्यावरील खासदार शरद पवार यांचाही प्रभाव संपून जाईल. तसेच काँग्रेस नेस्तानबूत झाली असून इतर प्रादेशिक पक्षही संपतील आणि भाजपचा प्रभाव वाढत जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केले.

साताऱ्यात पत्रकारांशी ते बोलत होते. त्यानंतर त्यांचा उंब्रज येथेही मेळावा झाला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. अतुल भोसले, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते.

मंत्री सोम प्रकाश म्हणाले, भाजप सरकारचा असलेला प्रभाव आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी काय तयारी करावी लागेल, याची माहिती घेतली आहे. यावरून जिल्ह्यातील भाजपचा प्रभाव वाढत चालला असून यापूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटला जाणारा सातारा आता शरद पवारांच्या प्रभावापासून लांब जाईल. भाजपला येथे चांगली संधी असून पक्षाच्या वाढीसाठी सर्वांचीच मदत होण्याची आवश्यकता आहे. आगामी काळात भारतात ३२ मोठी औद्योगिक केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. त्यातील तीन महाराष्ट्रात आणि एक साताऱ्यात आहे.

उंब्रज येथील मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे म्हणाले, तत्कालीन सहकारमंत्री दमबाजीचे राजकारण करीत होते. सत्तेचा दुरुपयोग केला जात होता. अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांना जेलमध्ये बसविण्याचे काम केले असल्याचा आरोप करून, येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत सातारा जिल्ह्याचा खासदार भाजपचा असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

साताऱ्याच्या लोकसभेच्या उमेदवाराबाबत मौन

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार निश्चित केला आहे का, तसेच खासदार उदयनराजे यांना संधी दिली जाणार का, असे विचारले असता मंत्री सोम प्रकाश यांनी सध्या सुरू असलेला दौरा पक्षवाढ आणि पक्ष बळकटीकरणाच्या दृष्टीने आहे. लोकसभा निवडणुकीला उमेदवार कोण असेल हे पार्लमेंटरी बॉडी ठरवणार आहे, असे स्पष्ट केले.

Web Title: Sharad Pawar influence on Satara politics will end, says Union Minister of State Som Prakash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.