"शरद पवार आयपीएलचे जनक, ते संघही ठरवतील अन् खेळाडूही"
By दीपक देशमुख | Published: January 21, 2024 06:36 PM2024-01-21T18:36:57+5:302024-01-21T18:37:32+5:30
शशिकांत शिंदे यांच्या गुगलीमुळे राजकीय उलथापालथीचे संकेत.
सातारा : खा. शरद पवार हेच आयपीएलचे जनक असून त्यांनीच देशात आयपीएल आणली. त्यामुळे कोणता खेळाडू पुढे आणायचा, कोणता संघ खेळणार, कोणाची विकेट घ्यायची हे खा. शरद पवारच ठरवतील, अशी राजकीय गुगली टाकत आ. शशिकांत शिंदे यांनी भविष्यातील राजकीय उलथापालथीचे संकेत दिले आहेत.
सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड येथील दौऱ्यात फडणवीस यांनी खा. उदयनराजेंना आयपीएलच्या संघाचे मालक असे संबोधले होते, त्याबाबत छेडले असता आ. शशिकांत शिंदे म्हणाले, खा. शरद पवार यांनीच देशात आयपीएल आणली आहे. त्यामुळेच कोणता संघ खेळेल, कोणता खेळाडू पुढे येईल. हे तेच ठरवतील.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, कारसेवक असल्याचे पुरावे फडणवीस यांना द्यावे लागतात, हेच दुर्दैवी आहे. बाबरी मशीद पाडली, त्यावेळी कोणी जबाबदारी घेत नव्हते. परंतु, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी धाडस दाखवले. शिवसेनेने घटनेची जबाबदारी घेतल्याचे व त्या शिवसैनिकांचा अभिमान असल्याचे जाहीर केले. आज मात्र सर्वजण याचे श्रेय घेत आहेत आहेत.
आ. शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत ज्या नेत्यांची भुमिका स्पष्ट आहे, त्यांच्याबाबत गावबंदीचा निर्णय घेताना विचार करावा. अन्यथा सरसकट सर्वच नेत्यांबाबत चुकीचा संदेश जाईल. सरकारने समाजात तेढ वाढू नये, यासाठी प्रयत्न करावे आणि आरक्षणाचा प्रश्न किती दिवसांत मार्गी लावणार हे स्पष्ट करावे. मुंबईला आंदोलनकर्ते आले तर मुंबई आणि पर्यायाने देश ठप्प होईल. देशाची निवडणूक लोकांनी हातात घेतली तर इतिहास घडेल. अन्यथा पुढील निवडणुक होईल हेही सांगता येणार नाही. भाजपाने इतर पक्षातील मातब्बर नेते घेतले तरीही ईडीच्या धाडी विरोधकांच्या घरी पडत आहेत. हीच का लोकप्रियता असा सवाल आ. शिंदे यांनी केला.
देवाला धर्मात वाटू नका
प्रभू श्रीराम कोणत्याही एका पक्षाचे नसून सर्व भारतीयांचे आहेत. देवाला धर्मात वाटू नये, राजकीय इव्हेंट हाेवू नये. अयोध्येचे मंदिर खूप वर्षांनंतर होत असून त्याचा आनंद आम्हा सर्वांनाच आहे.
माझी चर्चा झाली तर इतर सावध होतात
लोकसभेसाठी माझ्या नावाची चर्चा होत असल्याचा आनंद आहे. पण माझ्या उमेदवारीबाबत सध्या तरी बोलणार नाही, कारण मी बोललाे की बाकीचे सावध होतात, असे शिंदे म्हणाले.