शरद पवार कधीच कुणाशी विश्वासाने वागले नाहीत, जयकुमार गोरेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 03:58 PM2022-09-26T15:58:55+5:302022-09-26T15:59:33+5:30

यापुढे मात्र आमच्या कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही.

Sharad Pawar never trusted anyone, Criticism of MLA Jayakumar Gore | शरद पवार कधीच कुणाशी विश्वासाने वागले नाहीत, जयकुमार गोरेंचे टीकास्त्र

शरद पवार कधीच कुणाशी विश्वासाने वागले नाहीत, जयकुमार गोरेंचे टीकास्त्र

Next

खटाव : ‘सत्ता असताना मस्ती अंगात शिरली की यथावकाश जनतेतून उठाव होतो. कऱ्हाड उत्तरमध्ये गेल्या अडीच वर्षांत पालकमंत्र्यांनी नको इतका त्रास दिलाय. त्यांच्या जाचाला कंटाळून अनेक जण भाजपाची विचारधारा स्वीकारत आहेत. इथल्या जनतेने आता भाकरी फिरवून कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या आणि  शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारा आमदार असावा,’ असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी केले.

करवडी येथे  आयोजित संवाद यात्रा मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला कऱ्हाड उत्तरचे नेते धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, श्रीनिवास जाधव, सागर शिवदास, भीमरावकाका पाटील, सुरेश पाटील, महेश जाधव, महेंद्र डुबल, दीपाली खोत, सुजाता जाधव, चंद्रकांत मदने, प्रमोद गायकवाड, सरपंच पिसाळ तसेच मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पवार कधीच कुणाशी विश्वासाने वागले नाहीत. जे त्यांच्याबरोबर गेले त्यांचे त्यांनी वाटोळेच केले. सातारा जिल्ह्याने त्यांची पाठराखण केली. मात्र, त्यांनी जिल्ह्याला काहीच दिले नाही. आपला वापर करून स्वतःचा स्वार्थ त्यांनी साधला. जिल्ह्याचे मेडिकल कॉलेज रखडवले. जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घातले.

रयत शिक्षण संस्थेत मनमानी सुरू आहे. त्यांच्या कळपातील इतर नेतेही तसेच वागतात. कऱ्हाड उत्तरचे गेली अनेक वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी पालकमंत्र्यांनी इथल्या हणबरवाडी धनगरवाडी पाणीयोजनेसह  अनेक विकासकामे केली नाहीत. त्यांना शेतकऱ्यांच्या यातना माहीत नाहीत. त्यांनी फक्त सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांना त्रास द्यायचे काम केले. यापुढे मात्र आमच्या कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी सरकार आणि आम्हा पदाधिकाऱ्यांची ताकद उभी आहे. कराड उत्तरमधील पाणीयोजना भाजपच पूर्ण करणार आहे.’

कार्यक्रमात धैर्यशील कदम यांनी मनोगत व्यक्त करताना गेल्या अडीच वर्षांत या भागाचे झालेली अधोगती, कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. यापुढे मात्र अन्याय सहन केला जाणार नाही, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा त्यांनी दिला.

अनेकांना झालेला अपमान आणि अन्याय जिव्हारी लागलाय..

गेल्या दोन दिवसांतील संवाद यात्रेदरम्यान गावोगावच्या लोकांनी झालेल्या अपमानाचा पाढा वाचला. अनेकांचा स्वाभिमान दुखावला आहे. अन्याय झालेले अनेकजण बदला घेण्याच्या तयारीत आहेत. येत्या काळात भाजपची विचारधारा स्वीकारून या भागाच्या विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. लवकरच त्या सर्वांना भाजपमध्ये सामावून घेतले जाईल, असेही  आ. गोरेंनी सांगितले.

Web Title: Sharad Pawar never trusted anyone, Criticism of MLA Jayakumar Gore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.