Sharad Pawar: लोकं ऐकतात, हसतात अन् सोडून देतात, पवारांनी राज ठाकरेंची उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 08:33 PM2022-05-09T20:33:47+5:302022-05-09T20:38:24+5:30
ज्यांनी जातीवादी म्हणून मला हिणवलं त्याचा मी आस्वाद घेतला.
सातारा - हिंदुत्वाची कास धरलेल्या राज ठाकरेंनी आपल्या सभांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट टीका करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढीला लागला असून शरद पवार हे नास्तिक असल्याचंही राज यांनी जाहीर सभेत बोलून दाखवलं. राज यांच्या टीकेला शरद पवारांनी याआधीच प्रत्युत्तर दिलं आहे. सातारा येथील एका कार्यक्रमात बोलत असताना शरद पवारांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
ज्यांनी जातीवादी म्हणून मला हिणवलं त्याचा मी आस्वाद घेतला. अशाप्रकारची वक्तव्य केल्यामुळे लोक हसतात, पण अशी वक्तव्ये ते गांभीर्यानं घेत नाहीत. लोकं ऐकतात आणि सोडून देतात, असे म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरेंना कोणी गांभीर्याने घेत नसल्याचं म्हटलं. देशात महागाई, बेकारी वाढली आहे. या विषयांकडे न पाहता भोंग्यांचा विषय घेतला जातोय. ज्यांना आधार नाही ते अशाप्रकारे लोकांचं मन भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पवारांनी राज यांच्यावर केली आहे.
ओबीसी आरक्षणाबाबतही बोलले
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवारांनी, ओबीसी आरक्षण आणि भोंग्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि जाणकार योग्य तो निर्णय घेतील. जो सगळ्यांना मान्य असेल असाच निर्णय होईल. त्याची अंमलबजावणी कधी होईल याकडे आमचं लक्ष असेल, असंही स्पष्टीकरण पवार यांनी दिलं.
रयतचं स्वत:चं विद्यापीठ लवकरच होणार - पवार
रयतचं स्वत:चं विद्यापीठ असावं, हे आपणा सर्वांचं स्वप्न होतं. त्याचा पाठपुरावा सुरू होता. त्याला केंद्र व राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे. आवश्यक त्या बाबींची पूर्तता झाल्यानंतर येत्या जूनपासून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करू शकू, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ व्या स्मृतिदिनानिमित्त सातारा येथे त्यांच्या समाधीस्थळावर संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कर्मवीर अण्णांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संस्थेच्या प्रांगणात झालेल्या समारंभात शरद पवार बोलत होते.