शरद पवार यांनी पुरविला आठ वर्षीय सुमेधचा बालहट्ट!
By Admin | Published: May 10, 2016 01:55 AM2016-05-10T01:55:55+5:302016-05-10T02:27:46+5:30
जणू आजोबांना भेटल्याचा आनंद : पत्र पाठवून केली होती भेटण्याची इच्छा व्यक्त; काटकर कुटुंबीय गेले भारावून
संजय कदम-- वाठार स्टेशन -‘स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याशी माझा मावसभाऊ गप्पा मारायचा. त्यांना आजोबा म्हणायचा, मग माझे आजोबा कोण?,’ असा प्रश्न एका मुलानं विचारल्यानंतर आईनं ‘तुझे आजोबा शरद पवार आहेत,’ असं सांगितलं. अन् मग काय.. या मुलानं थेट शरद पवार यांनाच पत्र पाठवून भेटण्याचा हट्ट धरला. विशेष म्हणजे, या मुलाचा बालहट्ट देशाच्या राजकारणातील मोठया व्यक्तिमत्त्वानंही पूर्ण केला. सोमवारी एका कार्यक्रमासाठी पवार साताऱ्यात आले असता, त्यांनी त्या मुलाची भेट घेतली.आठ वर्षीय सुमेध काटकर असं त्या मुलाचं नाव. त्याची आई अॅड. सुचित्रा काटकर या लेखिका आहेत, तर वडील प्रवीण काटकर यांचा साताऱ्यातच मेडिकल व्यवसाय आहे. साताऱ्यातील आदर्श प्राथमिक शाळेत तो तिसरीत शिकत आहे. सुचित्रा यांची बहीण माढा तालुक्यातील एका प्रतिष्ठीत राजकारण्याची सून असल्याने माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची या कुटुंबाशी जवळीकता होती.
विलासराव माढ्यात आल्यानंतर ते या घरी भेट देत असत. यावेळी सुमेधचा मावसभाऊ हा विलासराव देशमुख यांच्याबरोबर खेळत असायचा आणि त्यांच्या भेटीचे किस्से सुमेधला सांगायचा. त्यामुळं तो आईला नेहमी ‘माझे आजोबा कोण?’ हा प्रश्न विचारायचा. आई अॅड. सुचित्रा घोगरे-काटकर त्याला ‘तुझे आजोबा शरद पवार आहेत,’ असे सांगून आपल्या एका पत्रकार मित्रास फोन लावून बाबांशी म्हणजेच शरद पवार यांच्याशी बोलण्यास सांगत होत्या. मात्र शरद पवारांनाच प्रत्यक्षात भेटण्याचा हट्ट ज्यावेळी सुमेधने धरला, त्यावेळी ‘तू स्वत:च्या हाताने शरद पवारांना पत्र लिही,’ असा सल्ला आईने दिला.
तेव्हा सुमेधने ११ एप्रिल रोजी थेट पवारांनाच पत्र पाठवून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मग दि. २८ एप्रिल रोजी पवारांना साताऱ्यात भेटण्याचं निमंत्रण त्याला दिल्लीतून मिळालं. ठरल्याप्रमाणे ‘दि. ९ रोजी दुपारी साडेचार वाजता शासकीय विश्रामग्रह सातारा येथे भेटण्यास यावे,’ असे सांगितले गेले. त्यानुसार सुमेध, आई सुचित्रा, वडील व मामा उमेश अनपट यांनी विश्रामग्रहात शरद पवारांची भेट घेतली.
यावेळी सुमेधच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत ‘अभ्यास कर, मोठा हो,’ असा पवारांनी सुमेधला आशीर्वाद दिला व त्यांचे स्वत:चे आत्मचरित्र असलेले पुस्तक त्याला भेट दिले. या अनोख्या भेटीमुळं चिमुकल्या सुमेधचा आनंद द्विगुणित झालाच अन् काटकर कुटुंबही भारावून गेले.
बारामती सुंदर, मग सातारा का नाही?
बऱ्याच वेळा सुमेध आजोळी जाताना त्याला बारामतीची सुंदरता नेहमीच आवडायची. मग बारामती चांगली आहे तर सातारा का नाही, असा प्रश्न सुमेध विचारायचा. यावर बारामतीचा विकास शरद पवारांनी केला, आपण साताऱ्यात शरद पवारांना घर बांधायला सांगू, असं उत्तर आई सुचित्रा मुलाला देत असे.
नेहमी फोनवर बोलणाऱ्या आजोबांशी प्रत्यक्ष भेटल्यामुळे खूपच आनंद झाला. त्यांना मी पत्र पाठविले होते. सोमवारी त्यांनी आम्हाला भेटायला बोलावलं. त्यांनी मला शाबासकी पण दिली. आता मी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याच्याशी पत्रव्यवहार करुन फटाक्यांवर बंदी घालण्याची अशी मागणी करणार आहे.
- सुमेध काटकर
सुमेध सतत प्रश्न विचारताना अनेक वेळा शरद पवार यांना भेटाण्यासाठी माझ्याजवळ हट्ट धरला. सुमेधने पाठविलेल्या पत्राची दखल त्यांनी घेतली व आमची त्यांच्याशी भेट झाली, याचा आम्हाला आनंद आहे.
- सुचित्रा काटकर, सुमेधची आई
साताऱ्यात सोमवारी शरद पवार व सुमेधची भेट झाली.