शरद पवार यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे, उदयनराजे यांनी व्यक्त केली अपेक्षा
By दीपक शिंदे | Published: October 13, 2023 08:28 PM2023-10-13T20:28:55+5:302023-10-13T20:29:53+5:30
साताऱ्यातील टोलनाके बंद करण्याबाबत मांडली भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्यात व केंद्रात मोठी पदे सांभाळली आहेत. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावे,’ अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकात परिषदेत ते बोलत होते.
खा. उदयनराजे म्हणाले, ‘अनुभव हा सर्वांत मोठा गुरू असतो. शरद पवार यांच्याकडे राजकारण, समाजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी राज्यात मुख्यमंत्रिपदापासून केंद्रात मोठ्या पदांवर काम केले आहे. पक्ष कोणताही असो, त्यांच्या अनुभवाची सर्वांना गरज आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायला हवे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याची चर्चा सुरू आहे, याबाबत छेडले असता ‘मुख्यमंत्री कोणीही होऊ दे’ असे सांगून अधिक बोलणे टाळले. राज्यात सध्या टोलनाक्यांचा विषय चर्चेचा ठरला आहे. माध्यमांनी या टोलबाबत विचारताच उदयनराजे म्हणाले, ‘जनतेला चांगले रस्ते मिळत नसतील तर का म्हणून टोल भरायचा. साताऱ्यातील दोन्ही टोलनाके बंद झालेच पाहिजेत. जरांगे पाटील यांची शनिवारी जालन्यात सभा होत आहे. या सभेला आपण जाणार नसल्याचेही ते म्हणाले.
भाजप सोडून कुठेही जाणार नाही
काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. साताऱ्यातील सभेत त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मताधिक्याने निवडून द्या, अशी साद जनतेला घातली होती. मात्र, लोकसभेबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. तुम्ही लोकसभेला वेगळा विचार करणार आहात का? असा प्रश्न विचारताना उदयनराजे म्हणाले, ‘ज्या - त्या वेळी सर्व गोष्टी होत असतात. मी सध्या तरी भाजप सोडून कोठेही जाणार नाही.