‘तरुण राष्ट्रवादी’चे शरद पवार हेच तारणहार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 07:37 PM2019-09-30T19:37:32+5:302019-09-30T19:38:13+5:30

रणांगणात प्यादी कोण? यापेक्षा लढतंय कोण? ते महत्त्वाचं असतं. ही लढाई उदयनराजे विरुद्ध राष्ट्रवादीतून जो संभावित उमेदवार असेल त्यांची मुळीच नाही. या लढाईत भाजपच्या महत्त्वाकांक्षेला शरद पवार कसे रोखतात, हेच पाहण्याजोगे आहे. आता यात ते कितपत यशस्वी किंवा अपयशी होतात, हे येणारा काळच ठरवणार आहे.

Sharad Pawar of 'Young Nationalist' is the savior ..! | ‘तरुण राष्ट्रवादी’चे शरद पवार हेच तारणहार..!

‘तरुण राष्ट्रवादी’चे शरद पवार हेच तारणहार..!

googlenewsNext

सागर गुजर ।

सातारा : राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष २० वर्षांचा झाला आहे. तरण्या-ताठ्या पोरानं बापाचा सांभाळ करण्याचं हे वय. परंतु वेळच अशी आलीय की पोर गर्भगळीत झाली असताना बाप मात्र उतारवयातही कुटुंबाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रस या तरण्याबांड पक्षासाठी ८० वर्षांचे त्याचे वडील शरद पवार तारणहार म्हणून काम करताना पाहायला मिळत आहेत.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दुनियाभर राजकारणाची उलथापालथ झाली; मात्र साता-याच्या राजकारणाने गेल्या दहा वर्षांत कधीच कूस बदललेली नाही. भाकरी फिरविण्याची वेळ निघून गेली. ती पार करपून गेली. तीन महिन्यांपूर्वी जी अटीतटीची लढाई करून युद्ध जिंकलं, तेच तख्त उदयनराजेंनी सोडून दिलं. मागील लोकसभा निवडणुकीत भाकरी बदलण्याची गरज पक्षातील अनेकजण व्यक्त करत होते. मात्र, ती बदलली नाही. आता करपलेल्या तव्यावरच नवीन भाकरी टाकण्यासाठी पक्षाच्या हालचाली सुरू आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता होणार आहे. ज्या भाजप-शिवसेनेच्या नेत्यांसोबत दोन हात करून उदयनराजे भोसले निवडून आले, त्याच नेत्यांच्या कळपात जाऊन बसलेल्या उदयनराजेंनी लोकसभेचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीला आव्हान दिलेले आहे. या अस्वस्थ वातावरणात राष्ट्रवादीचे बिनीचे शिलेदार पवारांसोबत अजूनही आहेत. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील मोठे ‘केडर’ हेच या पक्षासाठी बलस्थान आहे. या बलस्थानाच्या बळावर राष्ट्रवादी पुन्हा लढायला तयार झाली आहे.

रणांगणात प्यादी कोण? यापेक्षा लढतंय कोण? ते महत्त्वाचं असतं. ही लढाई उदयनराजे विरुद्ध राष्ट्रवादीतून जो संभावित उमेदवार असेल त्यांची मुळीच नाही. या लढाईत भाजपच्या महत्त्वाकांक्षेला शरद पवार कसे रोखतात, हेच पाहण्याजोगे आहे. आता यात ते कितपत यशस्वी किंवा अपयशी होतात, हे येणारा काळच ठरवणार आहे.
 

  • राज्य बँकेतील घोटाळ्याप्रकरणी संचालक नसतानाही खासदार शरद पवार यांच्यावर ईडीने (सक्त वसुली संचालनालय) गुन्हा दाखल केला. ईडीच्या कारवाईने अनेक नेते गारठून गेले होते. तर भाजपसमोर शरणागती पत्करून अनेकजण कमळासोबत गेले. मात्र याउलट पवारांनी लढाऊ वृत्ती दाखवून ईडीच्या कुठल्याही चौकशीला थेट सामोरे जायला निघाले. उलट ईडी कार्यालयासह वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनाच पवारांची समजूत घालावी लागली. काही दिवसांपासून भाजपच्या धक्क्यांची चर्चा माध्यमांतून गाजत होती. ही चर्चा पूर्णत: आपल्याभोवती वळवण्यात शरद पवार यशस्वी झाले आहेत.
  • राष्ट्रवादी अडचणीतून सावरत असतानाच अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तो मंजूरही केला. राज्य बँकेच्या घोटाळ्यात वारंवार अजित पवार यांचे नाव पुढे येत होते. तर आपल्या काकांनाही उतारवयात शुक्लकाष्ट सोसावे लागल्याने ते उद्विग्न असल्याचे त्यांच्या मुलांनी स्पष्ट केले आहे. राजकारणाची पातळी खालावल्याने मुलांसोबत शेती करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे, असे सांगितले जाते.

 

  • अजित पवार आपले काका शरद पवार यांना विचारल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय घेणार नाहीत, हे स्पष्ट आहे. त्यातच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादी तगड्या उमेदवाराचा शोध घेत आहे. कदाचित अजित पवार यांनाच उदयनराजे भोसले यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाऊ शकते, या निवडणुकीच्या तयारीचाच हा एक भाग असू शकतो, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. साताºयावरील असलेली बारामतीची कमांड पवारांना कुठल्याही परिस्थितीत ढिली होऊ द्यायची नाही.

Web Title: Sharad Pawar of 'Young Nationalist' is the savior ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.