'थोरल्या' पवारांची प्रीतिसंगावरुन नवी इनिंग सुरु!; महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार

By प्रमोद सुकरे | Published: July 3, 2023 03:50 PM2023-07-03T15:50:17+5:302023-07-03T16:22:05+5:30

..तेव्हा अजित पवारांनी कराडला येवून दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी बसून आत्मक्लेष केला होता

Sharad Pawar's new innings starts with Pretisangam karad | 'थोरल्या' पवारांची प्रीतिसंगावरुन नवी इनिंग सुरु!; महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार

'थोरल्या' पवारांची प्रीतिसंगावरुन नवी इनिंग सुरु!; महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार

googlenewsNext

प्रमोद सुकरे

कराड : दिवंगत यशवंतराव चव्हाण व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाते खूप जुनेच आहे. शरद पवार तर यशवंतरावांना गुरुस्थानी मानतात. आणि अख्खा महाराष्ट्र पवारांना यशवंतरावांचे मानसपुत्र म्हणून ओळखतो. ज्या ज्या वेळी पवार एखादी नवीन गोष्ट करतात. त्यात्या वेळी ते कराडच्या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नक्कीच नतमस्तक व्हायला येतात. आता राज्यात विशेषता राष्ट्रवादीत 'धाकट्या' पवारांनी भूकंप केल्यानंतर 'थोरले' पवार आज, सोमवारी कराडला आले. स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार केला आहे.

यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. देवराष्ट्रे हे त्यांचे मूळ गाव असले तर कर्मभूमी मात्र कराड राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यविधी कराडातच करण्यात आले. तर कृष्णा कोयनेच्या पवित्र प्रतिसंगमावर त्यांचे स्मृतिस्थळ उभारण्यात आले आहे. हे स्मृतिस्थळ महाराष्ट्राची जणू राजकीय पंढरीच बनली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  माजी आमदार दिवंगत पी डी पाटील यांनी हे स्मृतिस्थळ उभारण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर बोलताना शरद पवार म्हणाले ,अपप्रवृत्ती बाजूला करण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक शक्ती दाखवण्याची गरज आहे. त्याची सुरुवात आपण आज करत आहोत. आणि ती करण्यासाठी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाशिवाय दुसरी कोणतीही योग्य जागा नाही. म्हणून मी आज येथे आलो आहे. आज गुरु पौर्णिमाही आहे गुरूंच्या स्मृतीस्थळाला नतमस्तक होऊन येणाऱ्या काळात आपण महाराष्ट्र पिंजून काढणार असलेली त्यांनी यावेळी सांगितले.

 अजित पवारांनीही केला होता आत्मक्लेश 

राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील २००८/९ साली यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी आत्मक्लेष केला होता. एका भाषणामध्ये बोलताना अजित पवारांची जीभ  घसरली होती. त्यावर महाराष्ट्रातून वाईट प्रतिक्रिया येत होत्या. तेव्हा अजित पवारांनी कराडला येवून दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी बसून आत्मक्लेष केला होता.

हजारो समर्थकांची उपस्थिती !

शरद पवार यांच्या या कराडातील दौऱ्याची तयारी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली होती. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Sharad Pawar's new innings starts with Pretisangam karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.