सुभेदार नारायण ठोंबरे यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप- वाठार किरोलीत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:50 AM2017-12-28T00:50:18+5:302017-12-28T00:51:59+5:30
रहिमतपूर : ‘अमर रहे अमर रहे, नारायण ठोंबरे अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जब तक सूरज चाँद रहेगा, नारायण तेरा नाम रहेगा’ अशा गगनभेदी घोषणांच्या निनादात सुभेदार नारायण ठोंबरे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विराट जनसागराच्या साक्षीने कोरेगाव तालुक्यातील वाठार (किरोली) या गावी नारायण ठोंबरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुभेदार नारायण ठोंबरे हे आसाममधील तेजपूर भागात ४ कोर तोफखाना ब्रिगेडमध्ये कर्तव्य बजावत होते. यावेळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच वाठार (किरोली) गावावर शोककळा पसरली होती. कुटुंबीयांसह सर्वांनाचा त्यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा लागली होती.
सुभेदार नारायण ठोंबरे यांचे पार्थिव मंगळवारी (दि. २६) रात्री पुणे येथे आणण्यात आले. तेथून बुधवारी सकाळी नऊ वाजता वाठारमध्ये आणण्यात आले. यावेळी नारायण ठोंबरे यांचे पार्थिव पाहताच कुटुंबीयांसह नातेवाइंकांच्या अश्रूंचा बांध फुटला. सुभेदार नारायण यांच्या वीरपत्नी शोभा, मुलगा सूरज, धीरज आणि कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले. नारायण ठोंबरे यांचे पार्थिव दर्शनासाठी घरासमोरील अंबामातेच्या पटांगणात आणण्यात आले.
या ठिकाणी हजारो नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून नारायण ठोंबरे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. वाठारच्या स्मशानभूमीमध्ये मुलगा सूरज व धीरज यांनी सुभेदार नारायण ठोंबरे यांना मुखाग्नी दिला.यावेळी तहसीलदार स्मिता पवार, जिल्हा सैनिक बोर्डाचे वेल्फर आॅर्गनायझेशनचे चंद्रकांत पवार, अध्यक्ष उदाजीराव निकम, गोपाळ गायकवाड, नायब तहसीलदार मदने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कोरेगाव पंचायत समिती सभापती राजाभाऊ जगदाळे, सागर पाटील, रहिमतपूरचे नगराध्यक्ष आंनदा कोरे, भीमराव पाटील, संभाजीराव गायकवाड, विकास गायकवाड, सविता गुजले, पोपटराव गायकवाड, सुनील कांबळे, हवालदार राजेश पवार, स्वप्नील सावंत उपस्थित होते.
वाठार, ता. कोरेगाव गावातून सुभेदार नारायण ठोंबरे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी देण्यात आलेल्या ‘अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत गहिवरून गेला.