शिरवळमध्ये खडाजंगी; मायणीत तांदुळायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:00 AM2017-10-17T00:00:10+5:302017-10-17T00:00:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा/शिरवळ : खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाºया शिरवळ व असवली ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिरवळमध्ये किरकोळ शाब्दिक चकमक वगळता शांततेत मतदान पार पडले. शिरवळ ग्रामपंचायतीकरिता ८०.१२ टक्के तर असवलीकरिता चुरशीने ८९.३१ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, सर्वच तालुक्यात आमदार समर्थकांची ताकद पणाला लागली आहे. मंगळवारी होणाºया मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तसेच मायणी येथे एका मशिनमध्ये तांदूळ गेल्याने काहीवेळ मतदान थांबले होते.
शिरवळमध्ये सरपंचपदाकरिता तीन, सदस्यपदासाठी ५२ तर असवलीत सरपंचपदाकरिता तीन तर सदस्यपदासाठी १९ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतदानयंत्रामध्ये बंद केले. शिरवळ व असवली ग्रामपंचायतींच्या निवडणूकीकरिता सोमवारी चुरशीने मतदान झाले आहे. सकाळी मतदान सुरू झाल्यापासून मतदारांनी मतदान संपेपर्यंत उत्स्फूर्तपणे मतदान केले. जिल्हा परिषदेचे सदस्य उदय कबुले व ग्रामपंचायत सदस्य प्रदीप माने यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमकी घडल्यानंतर याठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तहसीलदार विवेक जाधव, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे तत्काळ दाखल होत परिस्थिती हाताळत कार्यकर्त्यांना पोलिसी हिसका दाखवित मतदान केंद्राच्या बाहेर पिटाळून लावले.
यावेळी वॉर्ड क्र. ६ मध्ये मतदारांच्या लाईनवरून उमेदवार ताहेर काझी व पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यावेळी वॉर्ड क्र. ३, ५, ६ यामध्ये किरकोळ शाब्दिक चकमक वगळता अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, शिरवळ व असवली याठिकाणी सातारा जिल्हा निवडणूक निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले, खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव यांनी मतदान केंद्रांना भेट देत पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र कोंडके, शिवाजी मरभळ, तुषार भांगे, तलाठी अजित घाडगे, बाळासाहेब खुंटे, आर. एन. पठाण आदी उपस्थित होते. यावेळी सरपंचांसह १७ सदस्यांकरिता ५५ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतदान यंत्रामध्ये बंद केले.
दरम्यान, असवली याठिकाणी तीन मतदान केंद्रांमध्ये २२३७ मतदारांपैकी १९९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. असवली याठिकाणी शांततेने ८९.३१ टक्के मतदान झाले आहे. यावेळी सरपंचपदासह एकूण २२ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतदान यंत्रामध्ये बंद केले आहे. शिरवळ याठिकाणी वॉर्ड क्र. ६, ५ यामध्ये मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केल्याने वेळ मतदार संपेपर्यंत वाढविण्यात आली.
अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर मतदान मशिन स्वच्छ
मायणी : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी मायणी येथे शांततेत मतदान पार पडले. किरकोळ शाब्दिक चकमकी वगळता दिवसभर मतदान केंद्राबाहेर शांतता होती. पोलिस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, मायणीतील वॉर्ड क्रमांक पाचमधील एका मशीनमध्ये तांदूळ गेल्यामुळे मशीन अर्धातास बंद होती. मशीन पूर्ववत झाल्यानंतर याठिकाणी मतदान सुरू झाले.
प्रत्यक्ष मतदानाला सोमवारी सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढला. तीन वाजेपर्यंत सरासरी सत्तर टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कडक ऊनातही मतदारांचा उत्साह कमी झाला नाही. मायणीत उत्स्फूर्तपणे व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
दरम्यान, वॉर्ड क्रमांक पाचमधील एका मशीनमध्ये तांदूळ गेल्यामुळे मशीन अर्धातास बंद होती. मशीन दुरुस्त केल्यानंतर या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली. मतदानामुळे मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.