शशिकांत यांचा शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:04 PM2024-04-15T22:04:14+5:302024-04-15T22:04:25+5:30
शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत साताऱ्यात रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी पक्षाचे नेते खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शशिकांत शिंदे यांनी गांधी मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. अर्ज भरतेवेळी समवेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील हेही उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या रॅलीसाठी सातारा येथील गांधी मैदानावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. रॅलीसाठी हलगी, तुतारी वादक पथके दाखल झाली होती. सकाळी अकरा वाजता खासदार शरद पवार आणि जयंत पाटील यांचे गांधी मैदानावर आगमन झाले. त्यांचे स्वागत शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील, राजकुमार पाटील आदींनी केले. यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत, कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत रॅलीने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान केले. सातारा, मोती चौक, कमानी हौद येथे आल्यानंतर रॅली शेटे चौकाकडे वळली व खालच्या रस्त्याने पोलिस मुख्यालय मार्गे पोवई नाक्यावर आली. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शशिकांत शिंदे यांनी अभिवादन केल्यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात आली. यानंतर शशिकांत शिंदे यांनी पत्नी वैशाली शिंदे व काही सहकाऱ्यांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एका अर्जासाठी माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण, तर दुसऱ्या अर्जसाठी आ. बाळासाहेब पाटील हे सूचक आहेत.
वाहतूक कोंडीमुळे पोलिसांची दमछाक
खासदार शरद पवार यांचे गांधी मैदानावर आगमन झाल्यानंतर त्याठिकणी गर्दी झाली. गर्दी आवरताना पोलिसांचीही दमछाक झाली. समर्थकांच्या गाड्यांमुळे राजपथावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यामुळे पोलिसांनी राजपथाकडे जाणारी वाहतूक अन्यत्र वळवली. तांदूळ आळी, नवीन मराठी शाळा, वाघाची नळी, कमानी हौदापाठीमागील रस्त्यांपर्यंत वाहनांमुळे चक्का जाम झाला.
सत्यजित पाटणकरांना द्यावी लागली टोपी
रॅलीसाठी सकाळी दहा वाजेपासूनच गांधी मैदानावर समर्थकांची गर्दी जमू लागली होती. काही कार्यकर्त्यांनी टोपी परिधान केली होती. उन्हाची काहिली होत असल्याने एक कार्यकर्ता ट्रॉलीपर्यंत येऊन टोपी देण्याचा सारखाच आग्रह करू लागला. अखेर सत्यजित पाटणकर यांनी ट्रॉलीतून खाली येऊन स्वतःच्या डोक्यावरील टोपी काढून त्याला दिली. यानंतर तो शांतपणे निघून गेला.