सरपंचपदाच्या इच्छुकांच्या स्वप्नांचा चक्काचूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:06 AM2021-02-05T09:06:45+5:302021-02-05T09:06:45+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील बारा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी पार पडली. या आरक्षणामुळे सरपंच पदासाठी आसुसलेल्या ...
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील बारा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी पार पडली. या आरक्षणामुळे सरपंच पदासाठी आसुसलेल्या अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला तर काहींना अनपेक्षितपणे लॉटरी लागल्याने त्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. सरपंचपदाच्या आरक्षणानंतर ‘कही खुशी, कहीं गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
रहिमतपूर परिसरातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अतिशय अटीतटीत पार पडली. दरम्यान, निकालानंतर सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अनेक विजयी उमेदवार अमुकच आरक्षण पडणार अन् मीच सरपंच होणार, अशा बतावण्या मारायला लागले होते. तर काहीजण आपण या रेसमध्येच नाही, असे मानून आपापल्या कामात व्यस्त झाले हाेते. अगदी सरपंचपदाच्या आरक्षण सोडती ठिकाणीही काहीजणांनी जाण्याचे टाळले होते. मात्र, आरक्षणामुळे अनपेक्षितपणे इच्छुक नसलेल्यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. निवडणुकीला लाखो रुपये खर्च केला असल्याची बतावणी करत स्वत:चा ऊर बडवून घेऊन मीच सरपंच होणार, अशा डरकाळ्या फोडणाऱ्यांच्या स्वप्नांचा मात्र आरक्षणामुळे चक्काचूर झाला आहे. या आरक्षण सोडतीमुळे अनपेक्षितपणे संधी मिळालेले उमेदवार गावाच्या विकासासाठी जबरदस्त योगदान देतील, असा आशावाद सर्वसामान्यांतून व्यक्त केला जात आहे.
वाठार किरोली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जातीसाठीचे राखीव आरक्षण जाहीर झाले आहे. धामणेर ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती महिला, साप ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती, तारगाव ग्रामपंचायतींसाठी सर्वसाधारण महिला, सायगाव ग्रामपंचायतींसाठी सर्वसाधारण, निगडी ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण महिला, सुर्ली ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण, किरोली ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण महिला, नलवडेवाडी ग्रामपंचायतींसाठी सर्वसाधारण, रिकीबदारवाडी ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण, काळोशी ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण महिला व दुर्गळवाडी ग्रामपंचायतींसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे.