भाचाच झाला तिचा भाऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:36+5:302021-08-22T04:41:36+5:30
परळी खोऱ्यातील अंकुश जाधव हे आपल्या संयुक्त कुटुंबाबरोबर कुरूण या गावात राहात होते. सहा भावांमध्ये एकुलती एक बहीण असलेल्या ...
परळी खोऱ्यातील अंकुश जाधव हे आपल्या संयुक्त कुटुंबाबरोबर कुरूण या गावात राहात होते. सहा भावांमध्ये एकुलती एक बहीण असलेल्या सुरेखा यांच्यावर सगळ्यांचेच विशेष प्रेम होते. मात्र, सुरेखा लहान असतानाच त्यांच्या डोक्यावरील आईचं छत्र हरपलं. आईविना भावांच्या कुटुंबामध्ये वाढणाऱ्या सुरेखा यांचा विवाह शाहुपुरी येथील नितीन मोरे यांच्याशी झाला. त्यानंतर, अवघ्या काही वर्षांतच अंकुश जाधव यांचे अपघाती निधन झाले. वडीलभाऊ गेल्याचं दु:ख अव्यक्त राहिलं. आपल्या पाच भावांची साथ असतानाही त्यांना मोठ्या दादांची कमतरता जाणवू लागली. याची कल्पना त्यांचा भाचा दशरथ जाधव यांना आली. साताऱ्यात राहणाऱ्या दशरथ यांनी आत्याची ही अस्वस्थता ओळखली आणि राखी पौर्णिमेला थेट शाहुपुरीत आत्याचे घर गाठले.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ उलटून गेला, तरीही आत्याकडून राखी बांधून घेण्यासाठी दशरथ शाहुपुरीत सुरेखा मोरे यांच्या घरी जातो. याविषयी बोलताना दशरथ जाधव म्हणाले, ‘कुटुंबप्रमुख म्हणून माझ्या वडिलांनी सगळ्या भावंडांना साथ दिली. आजीच्या पश्चात आत्या आणि वडिलांमध्ये अनोखे ऋणानुबंध मी पाहिले होते. लग्नानंतर ती माहेरी आली, तर तिचा पाहुणचार करण्यात आम्ही सगळेच व्यस्त असायचो. वडील गेल्यानंतर आत्याला त्यांची कमतरता जाणवते, हे लक्षात आलं. तिच्या बोलूनही झालं, पण तिच्या मनात त्यांच्या दादाची जागा रिकामीच वाटली. मग आत्याकडून राखी बांधून आपण तिला वडिलांची कमतरता भासू देऊ नये, असा विचार आला. तेव्हापासून सुमारे २२ वर्षांहून अधिक काळ ती मला राखी बांधते.’
भावाच्या मृत्यूनंतर भाच्याने आत्याबरोबर जोडलेले हे अनोखे नाते अव्याहतपणे दोन दशकांचा टप्पा ओलांडून पुढे प्रवाहित आहे. राखी पौर्णिमा आणि भाऊबीजेला दोघेही कुठंही असले, तरीही भेटणं आणि सण साजरा करणं हे त्यांच्या शेड्युलचा भाग आहे.
-प्रगती जाधव-पाटील