तिनं जनावरं सांभाळली; पण ‘पशू’नं घात केला: येणपेत तणावपूर्ण शांतता, त्यांनी वेळ साधली, तिला काळानं गाठलं; विकृतीनं जिल्हा हादरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:32 PM2018-08-29T23:32:57+5:302018-08-29T23:33:38+5:30
तिनं जनावरं सांभाळली. दिवस-दिवस ती त्यांच्यासोबत रानोमाळ भटकली. सोमवारीही ती जनावरं घेऊनच डोंगर पायथ्याला गेलेली; पण माणसातल्या पशूनं तिचा घात केला. ‘त्या’ दोघांनी एकटीला पाहिलं. वेळ साधली
कऱ्हाड : तिनं जनावरं सांभाळली. दिवस-दिवस ती त्यांच्यासोबत रानोमाळ भटकली. सोमवारीही ती जनावरं घेऊनच डोंगर पायथ्याला गेलेली; पण माणसातल्या पशूनं तिचा घात केला. ‘त्या’ दोघांनी एकटीला पाहिलं. वेळ साधली आणि काळ बनून त्यांनी तिच्यावर झडप घातली. येणपे येथे घडलेल्या अत्याचार अन् खुनाच्या घटनेनं जिल्हा हादरलाय. माणसातला पशू या घटनेमुळं पुन्हा एकदा समोर आलाय.
संबंधित विवाहिता दुपारपासून त्या शिवारात होती. मात्र, सायंकाळी माणसातलं श्वापद तिच्यावर झडप घालेल, असं तिला स्वप्नातही वाटलं नसावं. घराच्या ओढीनं पाऊलवाट तुडवत असतानाच त्या दोघांच्या तावडीत ती सापडली अन् क्षणात तिच्यासह कुटुंबाची भविष्यातील स्वप्नं उद्ध्वस्त झाली.
मुलीच्या ओढीनं निघाली घराकडे
येणपेच्या शिवारात दररोज अनेकजण जनावरे चारण्यासाठी घेऊन जातात. पीडित महिलाही दररोज जनावरांना घेऊन त्या ‘महारकी’ नावच्या शिवारात जायची. घरात लहान मुलगी असल्याने जनावरे चारून लवकर परत घरी येण्यासाठी तिची गडबड असायची. सोमवारीही पती आल्यानंतर जनावरं त्यांच्या हवाली करून ती मुलीच्या ओढीनं घराकडे निघालेली. मात्र, वाटेतच तिच्यावर दोघांनी घाला घातला.
आरोपी एकमेकांचे मित्र
या प्रकरणातील मुख्य आरोपी करण कोळी हा सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील ओकोली गावामध्ये राहण्यास आहे. त्याचे मूळगाव कºहाड तालुक्यातील साकुर्डी असून, येणपे येथे त्याचा मामा राहतो. त्यामुळे करणचे येणपे येथे येणे-जाणे होते. त्यातूनच त्याची गावातील अल्पवयीन मुलाशी ओळख झाली होती. दोघेही एकमेकांचे मित्र होते. करण आचारी म्हणून काम करीत होता. तसेच मिळेल ती मजुरीची कामेही तो करायचा.
सराईत करण पोलिसांच्या जाळ्यात
या प्रकरणातील मुख्य आरोपी करण कोळी हा रेकॉर्डवरील संशयित आहे. त्याच्यावर यापूर्वी चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत. तो एवढा सराईत आहे की, पोलिसांच्या तपासाच्या पद्धती त्याला चांगल्या ज्ञात आहेत. मोबाईलवरून पोलीस शोध घेऊ शकतात, हे माहीत असल्यामुळे तो मोबाईलच वापरत नाही. मात्र, तपास पथकाने अवघ्या सहा तासांत या सराईत आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही गावातूनच ताब्यात घेण्यात आले.
तपास पथकाला अधीक्षकांचे बक्षीस
येणपेतील ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आणि संवेदनशीलही होती. मात्र, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर, हवालदार महेश सपकाळ, धनंजय कोळी, रवींद्र पानवळ, शशिकांत काळे, अमित पवार, अमोल पवार, संदीप घोरपडे, विजय भोईटे, संजय काटे, विजय म्हेत्रे यांनी या प्रकरणाचा तपास केला अन् सहा तासांत गुन्ह्याला वाचा फोडली.
विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांचा संताप
अत्याचार अन् खुनाच्या घटनेनंतर ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे गावात तणाव असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी गावात विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करीत या घटनेचा सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले.
त्यांच्यातला पशू जागला
पीडित विवाहितेला त्या दोघांनी जनावरे चारताना पाहिले होते. ती एकटी घराकडे निघाल्याचे पाहून त्यांच्यातला पशू जागला. निर्जनस्थळी गाठले. ओढत झुडपाच्या आडोशाला नेले. त्याच ठिकाणी तिचा घात केला.