डोळ्यांपुढील कृष्णविवर तिने व्यापून टाकले स्वरांनी!

By admin | Published: November 2, 2014 10:34 PM2014-11-02T22:34:24+5:302014-11-02T23:29:42+5:30

पीयूषाची अमृतवाणी : अंध बालशाहीर म्हणून नवव्या वर्षी मिळविला नावलौकिक; चौदा वर्षांच्या दादाचीही चिमुकलीला कार्यक्रमात मनापासून साथसंगत

She covered her lips with black eyes! | डोळ्यांपुढील कृष्णविवर तिने व्यापून टाकले स्वरांनी!

डोळ्यांपुढील कृष्णविवर तिने व्यापून टाकले स्वरांनी!

Next

प्रदीप यादव - सातारा  -निसर्गाने तिच्या डोळ्यांसमोर उभे केलेले प्रचंड कृष्णविवर तिने आपल्या पहाडी आवाजाने आणि जादुई सूरांनी भरून काढले आहे. अभंग असो वा पोवाडा तिचा स्वर हलत नाही आणि ठेकाही चुकत नाही, चुकतो तो ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठोका.-कोरेगाव तालुक्यातील शिरंबे गावातील सुनील आणि रेखा भोसले या दाम्पत्याची पीयूषा ही नऊ वर्षांची मुलगी. जन्मत:च अंध; पण कुहू कुहू गाणाऱ्या कोकिळेसारखा गोड गळा पीयूला लाभला आहे. नियतीनं पीयूषाची दृष्टी हिरावून घेतली असली तरी निसर्गानं तिला गोड गळ्याची देणगी दिली आहे. ती जेव्हा अभंग गाते तेव्हा ऐकणारे भक्तिरसात न्हाऊन निघतात आणि जेव्हा पोवाडा सादर करते तेव्हा त्यातील वीररसाने अंगावर शहारे उभे राहतात. अवघ्या नवव्या वर्षात तिला गायनाची असलेली जाण आणि भानही आचंबित करणारे आहे.
सुनील भोसले हे नोकरीनिमित्त ते सातऱ्यात स्थायिक झाले आहेत. आपल्या गोड गळ्याच्या पीयूबाबत ते सांगतात, ‘पीयू जन्मत:च दृष्टिहीन. तिचा जन्म झाला तेव्हा खूप वाईट वाटले. देवानं कुठल्या जन्माची शिक्षा आम्हाला दिली, आमच्याच नशिबी असं अपत्य का यावं, अशा अनेक तऱ्हेच्या प्रश्नांनी डोक्यात काहूर माजविलेलं. पण जे नशिबी आलं त्याचा स्वीकार तर केला पाहिजे, या विचारानं आम्ही तिचं संगोपन केलं. तीन-चार वर्षांची असतानाच ती बडबड गीते म्हणायची. एवढंच काय तर ती गाता-गाता स्वत:चं नाव गाण्यात लीलया मिसळायची. घरात गायनाचा वारसा नसताना निसर्गानंच तिला ही देणगी दिली आहे, याची तेव्हा जाणीव झाली आणि तिला संगीताचं शिक्षण द्यायचं ठरविलं. साताऱ्यातील कृष्णानगर येथील ज्ञानभारती प्राथमिक शाळेत ती चौथीत शिकत आहे. तर संगीत शिक्षक लक्ष्मण चव्हाण यांच्याकडे ती शास्त्रीय संगाताचे धडे घेत आहे. क्लासमध्ये शिकविलेले रेकॉर्डिंग ऐकून तिची संगीताची तालीम सुरू आहे. शालेय शिक्षणातही ती उजवी ठरत आहे.
पोवाडा गायन हा अवघड गायनप्रकार पियूषानं कसा अवगत केला याबाबत सुनील भोसले यांनी एक किस्सा सांगितला. गेल्या वर्षी दिवाळीत प्रतापगडावर फिरायला गेलो तेव्हा गडावर शाहीर बाबासाहेब देशमुख यांचे पोवाडे रेकॉर्डवर वाजत होते. पीयू ते तन्मयतेनं ऐकत कानात साठवत होती. तिने मला पोवाड्याची सीडी ध्यायला लावली. त्यातील ‘गड आला पण सिंह गेला आणि प्रतापगडचा रणसंग्राम’ हे पोवाडे तिचे नुसतेच तोंडपाठ केले नाहीत तर अचूक शब्दफेक, स्वरांवरील पकड, त्यातील चढ-उतार, स्पष्टता आणि एकूणच तिचे सादरीकरण एवढे प्रभावी होते की अंगावर रोमांच उभे राहतात, अशा प्रतिक्रिया मिळत असल्याचे भोसले यांनी सांगितले.
एक वर्षात तिचे साताऱ्यासह पुणे, ठाणे येथे २१ कार्यक्रम झाले. सातारा आकाशवाणीवरही गायनाची संधी तिला मिळाली. प्रत्येक ठिकाणी तिचा होत असलेला गौरव डोळ्यांच्या कडा ओलावत होता. पीयूला तिचा मोठा भाऊ अभिजित साथसंगत करतो. पीयूनं जे साधलं आहे ते आयुष्यात आम्हाला कधीच जमले नसते. तिनं नवव्या वर्षीच स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आज आम्हाला ‘पीयूषाचे आई-बाबा’ या नावानेच लोक ओळखतात. नऊ वर्षांपूर्वी जो प्रश्न पडला होता की, ‘आमच्याच नशिबी असं अपत्य का?, याचं उत्तर आता मिळाल्यासारखं वाटतं.
गावाने केला सन्मान
आपल्या गावच्या पीयूषानं अवघ्या नवव्या वर्षांत आपल्या गायनानं सर्वांना मोहिनी घातली आहे. वीररसाने भरलेले शब्द आणि डफावर पडणारी थाप श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेते, याचा अभिमान शिरंबे गावाला आहे. बालवयात बहरलेल्या तिच्या गायकीचा सन्मान म्हणून गावोने ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात बालशाहीर पीयूषाला मानपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला. यावेळी नामदेव भोसले, कॅ. महादेव भोसले, लक्ष्मण सुतार, परशुराम सुतार, मुख्याध्यापक अमितकुमार शेलार, ग्रामस्थ उपस्थित होते.
संगीत क्षेत्रात मोठं व्हायचंय

मला गाणं खूप आवडतं. आई-बाबांनीही मी गाणं शिकावं म्हणून मला प्रोत्साहन दिलं. सध्या मी संगीताची पहिली परीक्षा दिली आहे. सर्व परीक्षा देऊन याच क्षेत्रात नाव मिळविणार आहे.
- पीयूषा भोसले

Web Title: She covered her lips with black eyes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.