मोहिते अन् भोसले यांच्यात पत्रक युध्द

By admin | Published: March 24, 2015 10:18 PM2015-03-24T22:18:57+5:302015-03-25T00:44:19+5:30

सहकार मंत्र्यांकडे दाद मागणार : सुरेश भोसले

Sheet war between Mohite and Bhosale | मोहिते अन् भोसले यांच्यात पत्रक युध्द

मोहिते अन् भोसले यांच्यात पत्रक युध्द

Next

राजकीय वातावरण तापले : कृष्णा साखर कारखान्याच्या अठरा हजार सभासदांच्या थकबाकी नोटीशीवर घमासान
कऱ्हाड : तालुक्यातील कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक अजून अधिकृतरीत्या जाहीर होणार आहे. मात्र, मंगळवारी तीन गटाच्या तीन नेत्यांनी ज्या पद्धतीने आक्रमकपणे पत्रकबाजी केली, ते पाहता यंदाची कारखान्याची निवडणूक प्रचंड गाजणार हे स्पष्ट झाले आहे. मंगळवारच्या पत्रकयुद्धाला निमित्त मिळाले, अठरा हजार सभासदांना पाठविण्यात येणाऱ्या थकबाकी वसुलीच्या नोटीशीचे. या मुद्यावरून मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, डॉ. सुरेश भोसले यांच्यासह विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी राजकीय वातावरण तापविले.

सहकार मंत्र्यांकडे दाद मागणार : सुरेश भोसले
‘कृष्णा’ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कृष्णेचे जवळपास ४६ हजार सभासद कऱ्हाड, वाळवा, खानापूर, कडेगाव तालुक्यात विभागले आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याने सुमारे १८ हजार सभासदांना थकबाकीच्या नोटीसा बजावल्या आहेत. ज्यामुळे सभासदांचा मतदानाचा हक्क धोक्यात येणची शक्यता आहे. मात्र सभासदांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही कृष्णा सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आज ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. उत्पादनखर्च वाढलेले असल्याने आणि साखरधंदा अडचणीत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शिवाय अजूनही अनेकांच्या शेतात ऊस शिल्लक असताना, अजूनही बिले प्राप्त झालेली नसताना अशाप्रकारे थकबाकीच्या नोटीसा पाठविणे अन्यायकारक आहे. कारखान्याने थकबाकीदार म्हणून बजावलेल्या नोटीसा चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्या आहेत. ऊस शेतात असतानाही त्याच्या ऊसाची पाणीपट्टी बिल थकबाकीत धरण्यात आली आहेत. पण मुळात जर सभासदांचा ऊस वेळेत गेला असता तर ही थकबाकी भरणे प्रत्येकाला शक्य झाले असते. शिवाय अन्य कारखान्यांप्रमाणे २१०० रूपयांप्रमाणे पहिला अ‍ॅडव्हान्स काढला असता तरी अनेकांना थकबाकी भरणे शक्य झाले असते. पण सभासदांना जाणीवपूर्वक मतदानापासून वंचित ठेवण्यासाठीच या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

विरोधकांनी थकबाकी भरावी : अविनाश मोहिते
‘डॉ. इंद्रजित मोहितेंनी कारखान्याच्या थकबाकीदारांना पैसे भरण्याचे आवाहन केले आहे. ही गोष्ट चांगली आहे. मात्र त्यांनी त्याची सुरूवात स्वत:पासून करावी. कृषी ज्ञानपिठाच्या नावे घेतलेली उचल त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भरावी. ते कारखान्याच्या हिताचे होईल,’ असे मत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. पत्रकात म्हटले आहे की, अध्यक्ष मदनराव मोहिते व त्यातील सदस्य लाखो रूपयांचे थकबाकीदार आहेत. तरीही त्यांची नावे आम्ही कच्च्या यादीत समाविष्ट केली आहेत. पण आज त्यांनी निवडणूकीत आपल्याला थकबाकीची डोकेदुखी ठरणार असल्याचे गृहित धरून १८ हजार सभासदांचे नाव घेत त्यांना नोटीसा पाठविल्याचे सांगत आपल्याला कळवळा असल्याचा दावा केला आहे. कारखान्यात कट आॅफ डेट नुसार ४६ हजार २२० ऊस उत्पादक सभासद आहेत. ९५ ब वर्गातील व्यक्ती सभासद आहेत. तर ६३ संस्था सभासद आहेत. त्या सर्वाची नावे कच्च्या यादीत समाविष्ट आहेत. जे मोठे थकबाकीदार आहेत. त्यांना निवडणूकीच्या प्रक्रीयेत सहभागी होता येणार नाही. तसेच ज्यांनी कारखान्याला अनेक वर्षे ऊसच घातलेला नाही, त्पण या संबंधातला निर्णय आम्ही सहकार आयुक्तांवर सोपविलेला आहे.
कारखाना सुरळीत सुरू आहे. महाराष्ट्रातील दालमिया शुगर्स, शाहू आणि शरद हे कारखाने वगळता कोणताच कारखाना नियमानुसार एफ. आर. पी. देवू शकलेला नाही. ज्यांनी देण्याचा प्रयत्न केला. त्यांची बिले लांबली आहेत. कृष्णाने फेब्रुवारी अखेरची बिले १९०० रूपयांप्रमाणे दिली आहेत. तर १५ मार्च पर्यंतची बिले दोन दिवसात जमा होणार आहेत.
हे तर सत्ताधाऱ्यांचे कारस्थान : इंद्रजित मोहिते
यशवंतराव मोहिते ‘कृष्णा’ सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी प्रभारी कार्यकारी संचालकांच्या सहीने १९ मार्च २०१५ ची तारीख टाकत या नोटीसा तयार केल्या आहेत. या नोटीसनुसार ८ दिवसाच्या आत संबंधीत थकबाकी भरून पावती घ्यावी. अन्यथा कारखाना निवडणूकीत तुम्ही सभासद हक्कापासून वंचित रहाल, असेही म्हंटले आहे. त्यामुळे सुमारे १८ हजारहून अधिक सभासदांना निवडणूक प्रक्रियेपासून लांब ठेवण्याचे कटकारस्थान सुरु दिसत आहे, ’ असा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते व डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी केला. मलकापूर येथील यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हिंंदूराव मोहिते, आदित्य मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती. मदनराव मोहिते म्हणाले, तरीसुध्दा येणेबाकी न दाखविता सभासदांना अंधारात ठेवत ऐन निवडणूकीच्या तोंडावर मार्च महिन्याच्या अखेरीस सभासदांना नगण्य अवधी देण्याचे काम संचालक मंडळाचे सुरु आहे. त्यामुळे अनेक सभासदांना इच्छा असूनही थकबाकीचे पैसे वेळेत भरणे शक्य होणार नाही. मी माझी थकबाकी किती आहे याची माहिती घेण्यासाठी कारखान्याकडे अर्ज केला, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर पोस्टाने रजिस्टर ए. डी. द्वारे थकबाकीची माहिती मागविली आहे मात्र त्याचेही अद्याप काहीही उत्तर मिळालेले नाही. मग ही माहिती सत्ताधारी मार्च नंतर देणार आहेत काय? असा सवाल इंद्रजित मोहिते यांनी करत यातूनच सत्ताधाऱ्यांचा हेतू स्पष्ट होत असल्याचे सांगितले.

Web Title: Sheet war between Mohite and Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.