शेखरभाऊंनी काढला वचपा..
By admin | Published: February 23, 2017 11:12 PM2017-02-23T23:12:15+5:302017-02-23T23:12:15+5:30
माण पंचायत समिती राष्ट्रवादीकडे : कुकुडवाडमध्ये भाजप तर काँग्रेसला गटाची एक गणाच्या तीन जागा
नवनाथ जगदाळे ---दहिवडी -माण तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत ५ पैकी ३ जागी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसला आणि भाजपला प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. पंचायत समितीच्या १० जागांपैकी सभापती आरक्षित जागेसह राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली असून, ५ जागा मिळवल्या. तसेच राष्ट्रवादी युतीतील ‘रासप’ला १ जागा मिळाली आहे. काँग्रेसला ३ तर भाजपला एक जागा मिळाली आहे.
माण तालुक्यात माजी आमदार दिवंगत सदाशिवराव पोळ यांच्या दोन्ही सुना राष्ट्रवादी पक्षातून विजयी झाल्या आहेत. मार्डी गटातून सोनाली मनोज पोळ व गोंदवलेमधून डॉ. भारती संदीप पोळ या निवडून आल्या आहेत. महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या आंधाळी गटात शेखर गोरे यांनी आमदार जयकुमार गोरे यांना धक्का दिला असून, राष्ट्रवादीचे बाबा पवार विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी दुर्योधन सस्ते यांचा पराभव केला आहे. याठिकाणी सत्तांतर झाले आहे. बिदाल गट पुन्हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. बाजार समितीचे सभापती अरुण गोरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे यांचा पराभव केला. तर कुकुडवाड गटात माय-लेकीच्या लढतीत लेकीने बाजी मारली आहे. तेथे प्रथमच कमळ फुलले असून, सुवर्णा अरुण देसाई यांनी कांचनमाला जगताप यांचा पराभव केला आहे.
पंचायत समितीमध्ये आंधळी गटातील आंधळी गणात व मलवडी गणात राष्ट्रवादीने बाजी मारली. आंधळीत कविता विवेकानंद जगदाळे तर मलवडीत विजयकुमार निवृत्ती मगर निवडून आले आहेत. बिदाल गटाच्या दोन्ही गणांत काँग्रेसने पुन्हा वर्चस्व राखले असून, बिदाल गणात अपर्णा भोसले तर वावरहिरे गणात रंजना जगदाळे विजयी झाल्या आहेत. गोंदवले गट पुन्हा राष्ट्रवादीने राखला असून, गोंदवले गणातून तानाजी कट्टे, पळशी गणातून नितीन राजगे हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. मार्डी गटातील मार्डी गणात सभापतीचे आरक्षण होते. तेथे राष्ट्रवादीचे रमेश पाटोळे हे सभापतिपदाचे उमेदवार निवडून आले आहे.राष्ट्रवादी व ‘रासप’च्या युतीचा फायदा झाला आहे.