विजेचा शाॅक लागून शेखरू जखमी, उपचारानंतर वन कर्मचाऱ्यांनी शेखरू सोडले नैसर्गिक अधिवासात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 07:38 PM2022-02-14T19:38:01+5:302022-02-15T10:44:39+5:30
महाबळेश्वर: विजेचा शाॅक लागून शेखरू जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. या जखमी शेखरुवर उपचार करून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ...
महाबळेश्वर: विजेचा शाॅक लागून शेखरू जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. या जखमी शेखरुवर उपचार करून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचे प्राण वाचविले व नंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडुन दिले.
महाबळेश्वर हे घनदाट सदाहरीत जंगलांनी व्यापलेले आहे. या जंगलात महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळख असलेल्या शेखरूंची संख्या मोठया प्रमाणावर वाढलेली आढळते. मखमली तांबुस रंग आणि झुपकेदार शेपटी असलेला राज्य प्राणी शेखरू हा झाडावर राहणारा प्राणी आहे. झाडावरील फळे खावून तो जगतो.
ग्लॅनओगल धरणाजवळ असलेल्या एका हॉटेल परीसरात हे शेखरू एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असतानाच झाडाखाली असलेल्या विजेच्या ताराला शेखरूची शेपटी लागली. यावेळी विजेचा झटका बसून हे शेखरू हे जमिनीवर कोसळले ते बराच वेळ बेशुध्द अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडुन होते.
शुभम फळणे यांना हे जखमी शेखरु निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याबाबत वन विभागाचे वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांना कळविले. फळणे यांनी हे जखमी शेखरू वन विभागाच्या कायार्लयात वन कर्मचारी यांच्या स्वाधिन केले. पशु वैदयकिय अधिकारी यांनी जखमी शेखरूवर उपचार केले.
आज शेखरूची तब्बेत बरी झालेली दिसली तेव्हा वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी शेखरूस त्याच्या नैसगिर्क अधिवासात सोडण्याचे आदेश दिले. वनक्षेत्रपाल यांच्या सुचने नुसार वनरक्षक लहु राउत व इतर कर्मचाऱ्यांनी शेखरूस हिरडा विश्रामगृहा जवळील जंगलात सोडुन दिले.