शहरातील आणखी एका मनोरुग्णाला निवारा

By admin | Published: September 3, 2016 11:24 PM2016-09-03T23:24:46+5:302016-09-04T00:36:12+5:30

‘लोकमत’ वृत्ताचा परिणाम : सदर बझार येथे यशोधन ट्रस्टच्या सदस्यांकडून माणुसकीचा ओलावा

Shelter in another city | शहरातील आणखी एका मनोरुग्णाला निवारा

शहरातील आणखी एका मनोरुग्णाला निवारा

Next

 सातारा : यशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उंब्रज परिसरातील तीन मनोरुग्णांना हक्काचा निवारा दिल्यानंतर आता साताऱ्यातील एका मनोरुग्णालाही ट्रस्टच्या वतीने येरवडा रुग्णालयात पाठविण्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. कायदेशीर सोपस्कर उरकून त्याला मंगळवारी येरवड्याला नेण्यात येणार आहे.
सामाजिक भावनेतून मनोरुग्णांवर मोफत उपचार होण्यासाठी ‘यशोधन’ चॅरिटेबल ट्रस्ट गेले काही वर्षे काम करत आहे. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून मनोरुग्ण आढळून आले की त्याविषयीची माहिती देणारे दूरध्वनी खणाणू लागले आहेत.
मनोरुग्णांना येरवड्याला पाठविण्यासाठीचे सर्व कायदेशीर सोपस्कार पोलिसांच्या मदतीने पूर्ण केले जातात. मनोरुग्णांना येरवडा येथे पोहोच करण्यापर्यंत सर्व जबाबदारी या संस्थेचे अध्यक्ष रवी बोडके व सोनाली बोडके हे दाम्पत्य करते. यापूर्वी ‘यशोधन’मार्फत वाई-मेढा-पुणे येथील सुमारे ७० मनोरुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
शनिवारी ‘लोकमत’मधील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर व्यावसायिक कन्हय्यालाल राजपुरोहित यांनी बोडके दाम्पत्याशी संपर्क साधला. त्यानंतर आपल्या चिमुकल्यासह बोडके दाम्पत्य मनोरुग्ण बसलेल्या सदर बझार येथील स्वरूप कॉलनी येथे पोहोचले. मनोरुग्णाशी बोलताना त्यांना खाऊचा आधार देणे महत्त्वाचे असते, हे ज्ञात असल्यामुळे आपल्याकडील खाऊ त्या मनोरुग्णाला दिल्यानंतर त्याने संवाद त्यांच्याशी संवाद साधला.
त्यानंतर त्याला येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे मानसोपचारतज्ज्ञ त्यांची वैद्यकीय तपासणी करणार असून, वैद्यकीय अहवाल तयार करण्याचे सोपस्कर पूर्ण करण्यात येणार आहेत. मंगळवारी त्याला येरवडा शासकीय मनोरुग्णालयात नेणार आहे.
‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ही संपूर्ण कार्यवाही होऊन मनोरुग्णाना छत मिळण्यास मदत होणार असल्याने अनेकांनी ‘लोकमत’चे कौतुक केले. (प्रतिनिधी)

दाम्पत्याची चिमुकल्यासह सेवा
येथील रवी बोडके यांच्याबरोबर या मोहिमेत त्यांच्या पत्नी सोनाली सहभागी होतात. अमानवीय अवस्थेत राहणाऱ्या लोकांना मदत करून त्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या कामात त्यांनी आपल्या एक वर्षाच्या बाळालाही सहभागी करून घेतले आहे. अत्यंत विचित्र अवस्थेत आणि अस्वच्छ असणाऱ्या या लोकांपर्यंत पोहोचताना ते चिमुकल्याला सोबत घेऊन जातात.

Web Title: Shelter in another city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.