दैवतांच्या मंदिराला मेंढ्यांची फेरी
By Admin | Published: October 25, 2014 11:50 PM2014-10-25T23:50:27+5:302014-10-25T23:50:27+5:30
वरकुटे-मलवडी : शेकडो वर्षांपासूनची परंपरा कायम
वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील मेंढपाळांनी गावातील दैवतांच्या मंदिराला मेंढरांची फेरी काढून जाण्याची परंपरा शेकडो वर्षांनंतरही कायम आहे. येथील दिवाळीचे हे एक मोठे वैशिष्ट्य ठरले आहे.
सुमारे शंभर वर्षांपूर्वी गावकुसातील मेंढपाळांनी ही परंपरा सुरू केली आहे. जवळपास शंभर ते दोनशे मेंढरांचे कळप असणारे अनेक मेंढपाळ वरकुटे-मलवडीच्या पंचक्रोशीत आहेत. दिवाळीच्या पाडव्यादिवशी आपल्या मेंढरांचा कळप घेऊन गावातील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन मंदिराला फेरी घालण्याची प्रथा पिढ्यान्पिढ्या चालत आलेली आहे.
नामदेव मिसाळ बासरीच्या सुरावर मेंढरांचे खेळ करून दाखवित असत. यामध्ये बासरीच्या सुरावर मेंढीला बोलावून घेणे, मेंढीला खाली बसवून रांगायला लावणे, मेंढीचे डोळे बांधून रांगायला लावणे असे खेळ करीत तसेच बकऱ्याच्या टकरा खेळावयास लावणे, अशा विविध खेळ गावात हे मेंढपाळ मोठ्या हौशेने दाखवितात.
दिवाळी दिवशी मेंढ्यांना वेगवेगळ्या रंगांनी रंगवून त्या गावात आणली जातात, गावच्या मध्यभागी ग्रामदैवतांच्या मंदिरासमोर हा मेंढरांचा खेळ सकाळी ७.३० वा. पासून दुपारी १२ वाजेपर्यंत चालतो. ग्रामस्थ गावच्या मध्यभागी असणाऱ्या ग्रामपंचायत चौकात फटाके वाजवून दिवाळीचे स्वागत व मेंढरांना घाबरवत असतात.
पूर्वी गावाच्या मध्यभागी असणाऱ्या ग्रामपंचायत इमारतीवर उभे राहून मेंढपाळ बासरी वाजवून मेंढ्याच्या कलागुण उपस्थित ग्रामस्थांस दाखवत. अनेकवेळा इमारतीस मेंढ्यांचा वेडा पूर्ण झाला तरीही अधिककाळ हा मेंढ्यांचा कळप भोवताली किती तरी वेळ फेऱ्या मारत असत, असे चित्र असायचे.
गावचे ग्रामदैवत नाथ-लक्ष्मीमाता मंदिर आदी मंदिराभोवताली मेंढ्यांची प्रदक्षिणा घालून दिवाळी साजरी करण्याची प्रथा याहीवर्षी मेंढपाळांनी कायम ठेवली. यावेळी वरकुटे -मलवडी परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)