शेट्टी, खोतांची मंित्रपदासाठी नौटंकी!
By admin | Published: December 7, 2015 10:16 PM2015-12-07T22:16:01+5:302015-12-08T00:31:30+5:30
पंजाबराव पाटील : ‘स्वाभिमानी’ला आंदोलनासाठी कार्यकर्तेच मिळणार नसल्याचा दावा
सातारा : ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गळा कापणाऱ्या मोदी सरकारशी खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी दोस्ती केली आहे. मंत्रिपद मिळण्याच्या आशेने या दोघांनीही भाजपचा हात धरला होता. आता मंत्रिपद मिळत नसल्याचे दिसल्यानंतर त्यांना ऊस उत्पादकांचा पुळका आला असून, आता ते आंदोलनाची भाषा वापरून नौटंकी करत आहेत,’ असा घणाघात बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या उसाला एक रकमी मिळाली पाहिजे, येत्या आठ दिवसांत शासनाने याबाबत निर्णय घ्यावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांसमोर पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
पाटील म्हणाले, ‘स्वामिनाथन कमिटीच्या निर्णयाला केंद्रातील मोदी सरकारने विरोध केला होता. मंत्रिपद मिळेल, या आशेने शेट्टी यांनी त्यांचा हात धरला. आमच्या जीवावर त्यांनी आंदोलने उभी केली, मात्र त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आता मंत्रिपद मिळेना असे वाटू लागल्याने ते आंदोलनाची भाषा वापरू लागले आहेत. शेट्टी यांच्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला असल्याने आता लढणारी फौज त्यांच्यासोबत राहिलेली नाही,’ असा टोलाही पाटील यांनी लगावला.
दरम्यान, सध्या रयत सहकारी साखर कारखाना शासनाचा गळीत परवाना नसताना व पाठीमागील गळीत हंगामातील गेलेल्या उसाचे बिल अद्याप दिले नसताना तसेच तोडणी व वाहतूकदारांचे बिल अद्याप दिले नसताना कारखाना सुरू झाला आहे. ‘एफआरपी’प्रमाणे दर देण्यासाठी ६ कोटी ११ लाख ९0 हजार इतके सॉफ्ट लोन शासनाने मंजूर करूनही नव्याने प्रशासक आलेल्या अथणी शुगर प्रा. लि. ने हे कर्ज नाकारले आहे. यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू शकतो. येत्या आठवडाभरात यावर निर्णय घ्यावा. तसेच ‘एफआरपी’प्रमाणे एकरकमी दर न देणाऱ्या कारखान्यांच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी इस्लापूरचे डी. जी. पाटील, चंद्रकांत यादव, दीपक पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तर अधिकाऱ्यांचे अपहरण
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी रक्तरंजित क्रांती केली जाईल. एसी मध्ये बसून शेतीचे धोरण ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांचे अपहरण करुन त्यांना डोंगरात नेऊन ठेवू, असा इशारा डी. जी. पाटील यांनी यावेळी दिला.