डुकरांना थोपविण्यासाठी नव्या कोऱ्या साड्यांची ढाल !
By admin | Published: July 16, 2017 03:59 PM2017-07-16T15:59:32+5:302017-07-16T15:59:32+5:30
पिकांचे संरक्षण : गुढे येथील शेतकऱ्यांची अनोखी शक्कल
आॅनलाईन लोकमत
ढेबेवाडी (जि. सातारा), दि. १५ :खरीप पिकांच्या समाधानकारक वाढीमुळे बळीराजा सुखावला असतानाच रानडुकरांनी थैमान घातले आहे . फटाक्यांचा आवाज आणि काटेरी कुंपणालाही डुकरांचे कळप दाद देत नसल्याने आता डुकरांना थोपवण्यासाठी रंगीबिरंगी साड्यांचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे. पाटण तालुक्यातील गुढे येथील शेतकऱ्यांनी हजारो रूपयांच्या नव्या कोऱ्या साड्या शेताच्या सभोवती गुंडाळून पिकांच्या संरक्षणाचा प्रयत्न केला आहे .
ढेबेवाडी विभागातील शिवारांमध्ये भात, भुईमुंग ,हाईब्रीड,अशा खरीप पीकांसह ऊसशेतीही चांगलीच बहरली आहे . बळीराजाही मशागतीमध्ये गुंतला असतानाच रानडुकरांनी मात्र पिकांच्या नुकसानीचा सपाटा लावला आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी फटाक्यांचा आवाज आणि काटेरी कुंपणाचा वापर केल. यावर्षी डुकरांचे कळप मानवी वस्तीकडे शिरकाव करू लागल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. गुढे गावच्या शिवारात काही दिवसांपासून डुकरांच्या मोठ्या कळपाने वास्तव्यच केले आहे .त्यांच्याकडून ऊसाचे मोठे नुकसान होत असल्याने त्यांना परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतात मोठ्या आवाजाचे फटाके रात्री वाजवले जायचे. तरीही नुकसानीचा झपाटा चालूच होता. डुकरांच्या बंदोबस्तासाठी अखेर तारेचे कुंपण घेतले तेही उध्वस्त केले . अखेर वैतागून येथील शेतकऱ्यांनी रात्रगस्त घातली. तेव्हा रंगीबिरंगी कपड्यांना घाबरून डुकरे पळ काढत असल्याचे त्यांना जाणवले .
संबंधीत शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी लगेचच तळमावले येथील कापड दुकानातून रंगीबिरंगी साड्या खरेदी करून संपूर्ण शेताला नव्या कोऱ्या साड्या गुंडाळल्या. यामुळे पिकांचे संरक्षण झाले असून पिकही नव्या नवरीसारखी नटल्याचे चित्र गुढे येथील शिवारांमध्ये दिसत आहे .