शिखर शिंगणापूर अतिक्रमणाच्या विळख्यात : यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांची होऊ शकते गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 08:19 PM2020-01-23T20:19:50+5:302020-01-23T20:22:05+5:30
शिंगणापुरातील अतिक्रमणामुळे मोकळी जागा कोठेही राहणार नाही. यामुळे ठिकठिकाणी गर्दी, गोंगाटात वाढ होणार आहे. भविष्यात ही परिस्थिती भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. याकडे सर्वांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.
म्हसवड : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या चैत्री यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येतात; परंतु विकासकामाऐवजी अतिक्रमणांचा विळखा वाढतच आहे. याबाबत तक्रारी केल्या; पण अधिकारी व्यस्त, लोकप्रतिनिधी सुस्त; अतिक्रमणधारक मस्त, अशी अवस्था झाली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर यात्राकाळात भाविकांचे हाल होऊ शकतात.
शिंगणापुरातील अतिक्रमणामुळे मोकळी जागा कोठेही राहणार नाही. यामुळे ठिकठिकाणी गर्दी, गोंगाटात वाढ होणार आहे. भविष्यात ही परिस्थिती भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. याकडे सर्वांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. प्रामुख्याने मुख्य राजवाडा चौक, बसस्थानक परिसर, ग्रामपंचायत, एमटीडीसी परिसर, शंभू महादेव मंदिर ते शिवस्मारक, जिल्हा परिषद मालकीचा रस्ता खोदून, सुरक्षित रस्ता साईड लोखंडी बार तोडून अतिक्रमणे थाटली आहेत.
वास्तविक शिखर शिंगणापूरमधील अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. अतिक्रमण प्रकरणात शिंगणापूरचे विद्यमान सरपंचाना व सदस्यांना अपात्र आणि पदावरून पायउतार व्हावे लागले होते, असे असूनही राजरोसपणे अतिक्रमणे वाढत आहेत. यामध्ये राजकीय वरदहस्त असणारी स्वत:ला प्रतिष्ठित म्हणून मिरवणारी, गावगाडा हाकणारी बडीधेंडे प्रतिष्ठित व्यापारी, शेतीवाडी असणारी सधन मंडळी, केवळ चढाओढीतून अतिक्रमणे उभारणीत पुढे आहेत.
जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिंगणापूर यात्रा नियोजन बैठकीत अतिक्रमणाबाबत झालेल्या चर्चेनुसार तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस यांच्या आदेशानुसार राजवाडा चौकातील अतिक्रमण काढून टाकण्यात आले होते. यात्रेकरूंची गैरसोयी टाळण्यासाठी ही कार्यवाही प्रशासनाने केली होती. मात्र, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणाबाबत प्रशासन यंत्रणा कोणती भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
- अतिक्रमणाबाबत शिंगणापूरला वाली कोण?
शिंगणापूरमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारे अतिक्रमण कोण रोखणार? अशी सामान्य जनतेतून विचारणा होत आहे. प्रशासन व्यस्त, लोकप्रतिनिधी सुस्त, अतिक्रमणधारक मस्त अशी परिसरात चर्चा तीर्थक्षेत्र पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा अतिक्रमणाबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.