शिखर शिंगणापूरच्या मुख्य मंदिरावर ध्वज, शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 11:16 PM2018-03-25T23:16:37+5:302018-03-25T23:16:37+5:30

शिखर शिंगणापूर येथील शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरापासून अमृतेश्वर मंदिराच्या कलशापर्यंत ध्वज बांधण्याचा कार्यक्रम रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.

Shikhar Shinganapur main temple flag, Shiv-Parvati wedding ceremony | शिखर शिंगणापूरच्या मुख्य मंदिरावर ध्वज, शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त लगबग

शिखर शिंगणापूरच्या मुख्य मंदिरावर ध्वज, शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त लगबग

googlenewsNext

दहिवडी (सातारा ) : शिखर शिंगणापूर येथील शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरापासून अमृतेश्वर मंदिराच्या कलशापर्यंत ध्वज बांधण्याचा कार्यक्रम रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. हर..हर महादेवच्या जयघोषाने शिंगणापुरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
श्री शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी मानाचे पागोटे बांधण्याचा कार्यक्रम पार पडला. महादेवाचे मुख्य मंदिर ते अमृतेश्वर (बळी) मंदिराच्या कलाशापर्यंत ध्वज बांधण्यात आला. मराठवाड्यातील आपेगाव व औसगाव (ता. कळस, जि. उस्मानाबाद) येथील साळी व कोष्टी समाजाला यंदा ध्वज बांधण्याचा मान मिळाला.
रविवारी दुपारी ध्वजाचे आगमन झाले. यानंतर वाजत-गाजत ध्वज मंदिर परिसरात आणण्यात आला.ध्वजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. हा साहसी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील हजारो भाविकांनी शिंगणापुरात हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर रात्री बारा वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा पार पडतो. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी शिंगणापूर येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अशी आहे प्रथा
ध्वज म्हणजे देवाचे मानाचे पागोटे. या पागोट्याला देवाचे वस्त्र म्हणूनही संबोधले जाते. सुमारे दीडशे मीटर लांबीचे हे वस्त्र विणण्याचे काम मानकरी वर्षभर करत असतात. या वस्त्राची गुढीपाडव्याला पूजा करून मानकरी हे वस्त्र शिखर शिंगणापूरला घेऊन येतात. यानंतर ध्वज बांधण्याचा कार्यक्रम पार पडतो.

असा बांधलो जातो ध्वज
प्रारंभी शिव मंदिराला ध्वजाचे एक टोक बांधले जाते. त्यानंतर हा ध्वज दोन्ही मंदिरांच्या मध्यावर आणला जातो. ध्वजाचे दुसरे टोक अमृतेश्वर मंदिराच्या कळसापर्यंत कासऱ्याने खेचले जाते. तीन-चार व्यक्ती हा ध्वज वर खेचून घेतात. ध्वज बांधण्याची कसरत दोन तास चालते. ध्वज सुटू नये, याशिवाय मंदिरावरून खाली येऊ नये, याची दक्षता घेतली जाते. हा ध्वज उतरला की यात्रेचा समारोप होतो.

Web Title: Shikhar Shinganapur main temple flag, Shiv-Parvati wedding ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.