शिलाखंड शिल्पांचे थाटात लोकार्पण ! २५ फुटी पिंपळाच्या झाडाचा १३३ किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:48 AM2021-12-24T00:48:03+5:302021-12-24T00:48:40+5:30

शिलाखंड शिल्पाच्या बरोबर मध्यावर २५ फूट उंच पिंपळाच्या झाडाचे रोपण करण्यात आले आहे.

Shilakhand sculptures inaugurate,133 KM journey of 25 feet peepul tree | शिलाखंड शिल्पांचे थाटात लोकार्पण ! २५ फुटी पिंपळाच्या झाडाचा १३३ किमी प्रवास

शिलाखंड शिल्पांचे थाटात लोकार्पण ! २५ फुटी पिंपळाच्या झाडाचा १३३ किमी प्रवास

googlenewsNext

सातारा : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून महामार्गालगत तयार करण्यात आलेल्या सह्याद्री देवराईत ‘विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय’ या संकल्पनेवर आधारित शिलाखंड शिल्पांचा लोकार्पण सोहळा मान्यवर आणि निसर्गप्रेमींच्या उपस्थितीत थाटात पार पडला. यावेळी २५ फुटी पिंपळाच्या झाडाचे रोपणही या देवराईत करण्यात आले.

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने महामार्गालगत असलेल्या पोलिसांच्या गोळीबार मैदानावर देवराई विकसित करण्यात आली आहे. या देवराईत ‘विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या शिलाखंड शिल्पाचे लोकार्पण जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, सामाजिक वनीकरणचे अधिकारी, शिल्पकार किशोर ठाकूर, सह्याद्री देवराईचे सचिन चंदने, मधुकर फल्ले, विजयकुमार निंबाळकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी आत्तापर्यंत बीड आणि नगर जिल्ह्यात देवराई उभारल्या आहेत. ओसाड माळरानावर देवराईच्या माध्यमातून पुन्हा हिवराई फुलवत राहण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. साताऱ्यात सुरु असलेल्या देवराईसाठी डोंगरमाथ्यावर पिंपळाचे डौलदार झाड असावे अशी त्यांची संकल्पना होती. त्यातूनच या झाडाची लागवड करण्यात आली आहे. यावेळी उपस्थितांना देवराईची संकल्पना आणि भविष्यात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमाला पानसरे नर्सरीचे बाळासाहेब पानसरे, जनार्दन जगदाळे, दिनेश पाटील, राजाभाऊ वाडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

२५ फुटी पिंपळाचा १३३ किलोमीटरचा प्रवास
शिलाखंड शिल्पाच्या बरोबर मध्यावर २५ फूट उंच पिंपळाच्या झाडाचे रोपण करण्यात आले आहे. हे झाड अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या गावातून आणण्यात आले आहे. सुमारे १३३ किलोमीटरचा प्रवास करून हे झाड देवराईत पुन्हा लावण्यात आले. सुमारे आठ वर्षे बाळासाहेब पानसरे यांनी स्वत:च्या नर्सरीत हे झाड वाढवले आहे. बुधवारी रात्री हे झाड साताऱ्याकडे ट्रकमध्ये आडवे करून आणण्यात आले.

महामार्गाशेजारी बराच मोकळा डोंगर आहे. येथे जैवविविधतेची जपणूक होण्याच्या दृष्टीने आम्ही देवराई निर्मितीचा प्रयत्न केला. समविचारी एकत्र आल्याने शिलाखंड शिल्पाची निर्मिती आणि झाडाचे प्रतिरोपण हे दोन्ही अभिनव उपक्रम यशस्वी झाले. हे सर्व आपल्या मायभूमीत केल्याचा विशेष आनंद आहे, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Shilakhand sculptures inaugurate,133 KM journey of 25 feet peepul tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.