शिरवळमध्ये गुंड पोसण्याचे कारखाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2015 09:34 PM2015-09-01T21:34:03+5:302015-09-01T21:34:03+5:30
औद्योगिकीकरणास डोकेदुखी : असंख्य प्रकरणे मिटविण्यासाठी तरुणांकडून साम, दाम, दंड, भेदचा वापर
मुराद पटेल - शिरवळ परिसरातील वाढते औद्योगिकीकरण विकासाला पुरक ठरत असले तरी त्याचप्रमाणे डोकेदुखी ठरू लागली आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून स्थानिक तरुणांमध्ये ‘सेटलमेंट गुरु’चा फंडा वाढीस लागला आहे. यामध्ये आम, दाम, साम, दंड यांचा वापर केला जात आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे खंडाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व लघु उद्योगांचे जाळे निर्माण झाले आहे. याठिकाणी उद्योगांचे जाळे निर्माण झाल्याने तरुणांना रोजगार निर्मिती होऊन तालुक्याचा कायापालट होऊन विकासाची दारे खुली होतील, अशी स्वप्ने येथील जनतेला पडली होती. मात्र, या विकासाबरोबर पुण्याच्या धर्तीवर अपप्रवृत्तीही फोफावली आहे.
तालुक्यातील तरुणांमध्ये कमी वेळ, कमी श्रमात जास्त पैसा हा कानमंत्र मोठ्या प्रमाणात घुमू लागला आहे. यामधून तरुण पिढी एकत्र येत उद्योगांना येणाऱ्या समस्या किंवा इतर बाबींमध्ये येणाऱ्या तक्रारी दूर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
तरुणांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडीतून चांगला पैसा मिळू लागला आहे. त्यामुळे सध्या खंडाळा तालुक्यातील तरुणांमध्ये ही प्रवृत्ती वाढीस लागली आहे. यामध्ये संबंधितांना राजकीय आश्रयही मिळत असल्याने संबंधित तरूणांचे दिवस जोमात आहेत. याच प्रकारातून शिरवळ येथे भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर सोमवारी प्राणघातक हल्ला झाल्याची चर्चा आहे.
औद्योगिक कंपन्यांना लागणारा कामगार, पाणी यासारख्या मुलभूत गरजा पुणे येथील एजन्सीकडून पूर्ण केल्या जातात. तर काही प्रमाणात स्थानिकांकडून पुरविल्या जातात. मात्र, याठिकाणीही भूमिपुत्रांचा स्वाभीमान जागा झाल्याने येथील कंपन्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या गाड्या अडविल्या होत्या. यामध्ये संबंधित पाणीपुरवठादार व स्थानिकांमध्ये किरकोळ वादावादी झाली होती.
यावेळी संबंधित पुरवठादाराने येथील कुख्यात गुन्हेगारी असणाऱ्या वैभव शिवतरे यांच्याबरोबर संपर्क साधत हा प्रश्न सोडविण्यासाठी आर्थिक तडजोडी केल्याचे येथील स्थानिकांचा दावा असून याबाबत परिसरात चर्चाही रंगू लागली आहे. यामधूनच स्थानिकांमध्ये व वैभव शिवतरे याच्या काही साथीदारांसमवेत पंढरपूर फाटा येथे चार ते पाच दिवसांपूर्वी मारामारीही झालेली होती. यावेळी काहींनी पुढाकार घेत हा वाद मिटविला होता. यामध्ये सोमवार प्राणघातक हल्ला झालेला तौसिक काझी हा भांडणे सोडविण्याच्या कारणावरुन वैभव शिवतरे व त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला, असल्याची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात तौसिक काझी याने दिली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे खंडाळा तालुक्यातील विशेषत: शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
खंडाळा तालुक्यामध्ये वाढते ओद्योगिकीकरण होत असताना विकासाबरोबरच तरुण पिढीला योग्य रोजगार मिळणे गरजेचे बनले आहे. आजच्या परिस्थितीत सोमवारी झालेल्या घटनेवरुन एकच निदर्शनास येते की तालुक्यातील तरुण पिढी ही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे तर चालली नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. तालुक्याच्या भविष्यासाठी व तरुण पिढीच्या उत्कर्षासाठी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपाआपले मतभेद विसरुन एकत्र येत तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
- नितीन भरगुडे-पाटील, सदस्य, पंचायत समिती खंडाळा
राजकीय हस्तक्षेप बंद होणार का?
शिरवळ हे तालुक्यातील एक प्रमुख शहर म्हणून गणले जात आहे. येथील औद्योगिकीकरणामुळे स्थलांतरीत झालेला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणी कंपन्यांमधून आपले वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी येथे संघंटीत टोळ्याही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. या टोळ्यांवर नियंत्रण कोण आणणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्येच संबंधितांना राजकीय आश्रय मिळत असल्याने या टोळ्या मोठ्या प्रमाणावर वाढीस लागल्या आहेत.