जावली तालुका सुंदर गाव स्पर्धेत शिंदेवाडी प्रथम, फेरतपासणी होऊन निवड जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 PM2021-05-28T16:25:29+5:302021-05-28T16:33:45+5:30
Zp Satara : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पाचगणीच्या पायथ्याशी वसलेल्या शिंदेवाडीला जावळी तालुक्यातून आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाला आहे. स्पर्धेत जावली तालुक्यातील चोरंबे व शिंदेवाडीची या दोन ग्रामपंचायतीमध्ये चुरस होती. सुरुवातीला चोरांबेला हा पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र फेरतपासणी होऊन २०१९-२० करिता तालुक्यातून सुंदर गाव म्हणून शिंदेवाडीची निवड करण्यात आली आहे.
कुडाळ : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पाचगणीच्या पायथ्याशी वसलेल्या शिंदेवाडीला जावळी तालुक्यातून आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाला आहे. स्पर्धेत जावली तालुक्यातील चोरंबे व शिंदेवाडीची या दोन ग्रामपंचायतीमध्ये चुरस होती. सुरुवातीला चोरांबेला हा पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र फेरतपासणी होऊन २०१९-२० करिता तालुक्यातून सुंदर गाव म्हणून शिंदेवाडीची निवड करण्यात आली आहे.
याबाबतचा निकाल नुकताच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी जाहीर केला. सन २०१९-२० करिता आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत जावळी तालुक्यातील ग्रामपंचायतीची तपासणी गटविकास अधिकारी वाई यांच्या मार्फत करण्यात आली होती. यानुसार आठ फेब्रुवारी २०२१ रोजी गुणांकन करून यादी जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करण्यात आली होती. यामध्ये तालुक्यातील चोरंबे गावाला ८९ गुण तर शिंदेवाडीला ८६ गुण दिले होते.
मात्र शासन निर्णयातील तरतुदीनुसार सरपंच शिंदेवाडी यांनी हरकत घेऊन सदर गुणांकन मान्य नसल्याबाबत तक्रार केली होती. यानुसार चोरंबे व शिंदेवाडी या दोन्ही ग्रामपंचायतीची पुरस्काराच्या निकषानुसार ९ मार्च २०२१ रोजी फेरतपासणी करण्यात आली. यामध्ये गुणांकणानुसार शिंदेवाडीच्या आर. आर. आबा पाटील सुंदर गावच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
शिंदेवाडी ग्रामस्थांनी सुंदर गाव होण्यासाठी खूप परिश्रम घेतले. ग्रामस्थांच्या चिकाटीमुळे आणि केलेल्या प्रामाणिक कष्टामुळे आम्हाला यशाची आशा होती. आकस्मितपणे आम्ही स्पर्धेतून बाहेर पडलो परंतु आम्ही धीर सोडला नाही. त्यासाठी पाठपुरावा केला त्यामुळेच आम्ही आज सुंदर गाव योजनेचा प्रथम क्रमांक पटकविला आहे.
- धनश्री शिंदे,
सरपंच शिंदेवाडी