शिंगणापूर यात्रा: शंभू महादेवाला जलाभिषेकसाठी कावडी रवाना, फलटणमध्ये मानाच्या कावडींचे भव्य स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 03:41 PM2022-04-12T15:41:00+5:302022-04-12T15:43:48+5:30
शिखर शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाला परंपरागत पध्दतीने जलाभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून अनेक मानाच्या कावडी शिखर शिंगणापूरकडे रवाना होत आहेत.
फलटण : शिखर शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाला परंपरागत पध्दतीने जलाभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून अनेक मानाच्या कावडी शिखर शिंगणापूरकडे रवाना होत आहेत. फलटणच्या भाविकांतर्फे या मानाच्या कावडींचे यथोचित स्वागत करण्यात आले. कोरोनानंतर दोन वर्षांनी या कावडी आल्याने फलटणकरांनी उत्साहात कावडींचे गुलालाच्या उधळणीत स्वागत केले.
शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते. यात्रेची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. शुभशकुनाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वतीमातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाचं लग्न लावलं जातं. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राजघराण्यातील युवराज किंवा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो.
कोरोनामुळे मानाच्या कावडीही फलटण मार्गे शिंगणापूरला गेल्या नव्हत्या. मंगळवारी एकादशीच्या निमित्ताने फलटणकरांना कावडींचे आगमनाची प्रतीक्षा होती. शिंगणापूर यात्रेनिमित्त फलटण येथून शिखर शिंगणापूरकडे जाणाऱ्या मानाच्या कावडी नियोजनाप्रमाणे परंपरागत मार्गाने शंभू महादेवाच्या पायथ्याशी मुंगीघाटाकडे मार्गस्थ झाल्या. तत्पूर्वी फलटणमधील भाविकांनी कावडी व त्यासोबत असणाऱ्या मानकऱ्यांंचे स्वागत करुन दर्शन घेतले. कावडीसोबत असणारी परंपरागत डफडी, शिंग, तुताऱ्या आणि हरहर महादेवाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला होता.