कऱ्हाडात आज शिरखुर्मा-मोदकाचा गोडवा एकत्र!
By admin | Published: September 24, 2015 10:23 PM2015-09-24T22:23:11+5:302015-09-24T23:57:30+5:30
जिल्हाधिकारी, पोलिसप्रमुखांची हजेरी : राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी मुस्लिम समाजाचा पुढाकार -- गूड न्यूज
प्रमोद सुकरे --कऱ्हाड सण म्हटले, की विशिष्ट पदार्थ ही खासीयत असते. गणेशोत्सव म्हटले की मोदक आठवतात, तर ईद म्हटलं की शिरखुर्मा! पण गणेशोत्सव अन् ईद हे दोन्ही सण एकत्रित आल्याने कऱ्हाडात मुस्लिम समाजाने पुढाकार घेत शिरखुर्म्याबरोबर मोदकाच्या प्रसादाचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रीय एकात्मता जपण्याच्या हेतूने आयोजित केलेला हा उपक्रम सामाजिक गोडवा वाढविणारा ठरणार आहे.खरं तर शुक्रवारची ईद ही ‘बकरी ईद’ आहे. ‘रमजान ईद’ला शिरखुरमा खायला दिला जातो. मात्र तरीही मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन शिरखुर्म्याबरोबर मोदकवाटपाचा घेतलेला निर्णय, त्यामागची ऐक्य जपण्याची भावना शहरात कौतुकास्पद ठरली आहे. भारतात अनेक जाती-धर्मांचे नागरिक गुण्यागोविंदाने एकत्रित नांदतात. एकमेकांच्या सुख-दु:खात अन् सण-समारंभात सक्रिय सहभागी होतात. इफ्तार पार्टीसुध्दा त्याचाच एक भाग असतो. ईदनिमित्त होणाऱ्या इफ्तार पार्टीत हिंदू समाजबांधवही मोठ्या संख्येने सहभागी होतात. अनेक ठिकाणी हिंदू समाजातील लोक मुस्लिम समाजबांधवांसाठी इफ्तार पार्टी आयोजित करताना पाहायला मिळतात. हासुध्दा एक जातीय सलोखा राखण्याचाच प्रयत्न असतो.
आज देशासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा वेळी हिंदू-मुस्लिम समाजाने फक्त सणापुरते एकत्रित येऊन शिरखुर्मा अन् मोदकाचा प्रसाद खाण्याबरोबरच देशाच्या ऐक्यासाठी, भारताच्या हितासाठी हातात हात घालून, आव्हानांना सामोरे गेले पाहिजे, अशी मानसिकता समाजात तयार होत आहे. कोणताही जात-धर्म नसणारा दहशतवाद मोडीत काढून राष्ट्रीय एकात्मता जोपासली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून कऱ्हाडकरांनी उचललेले हे पाऊल नक्कीच मैलाचा दगड ठरणार आहे. या अभिनव उपक्रमाचे कऱ्हाड शहरवासीयांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे.
४० किलोचे मोदक,
५० लिटरचा शिरखुर्मा!
मुस्लिम समाजात शिरखुर्मा बनविला जातो. पण मोदक बनविण्याचे काम त्यांच्या दृष्टीने अवघड! त्यामुळे येथील मुस्लिम संयोजकांनी सुमारे एक हजार लोकांना पुरतील या दृष्टीने मोदक बनविण्याचे काम एका व्यक्तीकडे सोपविले आहे. ४० किलोचे खव्याचे मोदक तयार करण्यात येणार असून, विठ्ठल चौकात गणपतीची आरती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते झाल्यानंतर ते मोदक प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहेत. येणाऱ्या सर्वांसाठी ५० लिटर दुधाचा शिरखुर्माही तयार करण्यात येणार आहे.
२००८ ची आठवण ताजी!
२००८ मध्ये रमजान ईद व गणेशोत्सव एकत्रित आला होता. त्यावेळीही मुस्लिम समाजबांधवांनी एका सभागृहात हिंदू-मुस्लिम बांधवांना मोदक व शिरखुर्मा वाटण्याचा छोटेखानी कार्यक्रम घेतला होता. यंदा मात्र या कार्यक्रमाचं स्वरूप जाहीर व विस्तृत करण्यात आलं आहे.
३६ वर्षांनंतर आला योगायोग
गणेशोत्सव अन् बकरी ईद असा योगायोग तब्बल ३६ वर्षांनंतर जुळून आला आहे. हा योगायोग अधिक सुंदर बनविण्यासाठी शिरखुर्मा अन् मोदकांचा मुस्लिम समाजाने घातलेला मेळ इतरांना प्रेरणादायी आहे.
गेल्या महिन्यातच झाला निर्णय
गेल्या महिन्यात कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक झाली होती. या बैठकीतच माजी उपनगराध्यक्ष फारूक पटवेकर यांनी मोदक अन् शिरखुर्मा वाटपाचा एकत्रित कार्यक्रम आयोजिणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मुस्लिम समाजातील जेष्ठांशी विचारविनिमय होऊन शुक्रवारचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.