पुसेगाव स्पर्धेत शिरवळचा रॉकस्टार अजिंक्य
By admin | Published: December 17, 2014 10:04 PM2014-12-17T22:04:30+5:302014-12-17T23:01:11+5:30
श्री सेवागिरी महाराज यात्रा : सांगलीच्या डायमंड क्लबचा पराभव
पुसेगाव : श्री सेवागिरी यात्रेनिमित्त पुसेगाव, ता. खटाव येथे भरविण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत शिरवळच्या रॉकस्टार संघाने सांगलीच्या डायमंड क्लब संघाचा पराभव करून अजिंक्यपद मिळविले. पुण्याच्या स्मॅशर क्लबने या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. शिरवळच्या संघाचा खेळाडू कृष्णा सातपुते ‘मॅन आॅफ दि मॅच’चा मानकरी ठरला.
श्री सेवाीगरी महाराजांच्या ६७ व्या पुण्यस्मरणार्थ येथे वार्षिक यात्रा सुरू आहे. यानिमित्ताने आयोजित क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत १६ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या उपांत सामन्यात बिचुकले क्लबचा पराभव करून शिरवळच्या रॉकस्टार संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेत्या संघांना अनुक्रमे ५१,०००, ३१,००० व २१००० रुपये रोख बक्षिसे देण्यात आले. तसेच या स्पर्धेत शिरवळच्या संघातील बबलू पाटील, पप्पू रामगौडे, मुकेश गोयल तर सांगलीच्या संघातील अमोल भोज, श्रवण पवार, वसीम शेख यांनी आकर्षक खेळ करत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्ट चेअरमन डॉ सुरेश जाधव यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षिसे देण्यात आले.
मोहनराव जाधव, डॉ प्र.ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, अॅड. विजयराव जाधव, रणधिर जाधव, मानाजी घाडगे, सुभाषराव जाधव, बाळासाहेब जाधव, महेंद्र नलवडे, मनोज नलवडे, अंकुश पाटील, योगेश देशमुख उपस्थित होते. विकास जाधव, अरुण मदने, विकास जाधव, किशोर मदने, विकास शिंदे यांनी पंच म्हणून काम पाहिले. (वार्ताहर)