सभापतिपदासाठी शिर्के, गिरी दावेदार
By Admin | Published: February 28, 2017 11:43 PM2017-02-28T23:43:09+5:302017-02-28T23:43:09+5:30
जावळी तालुका : निवडीची उत्सुकता शिगेला; राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहणार
आनंद गाडगीळ ल्ल मेढा
जावळी पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेल्या निर्विवाद यशानंतर व वर्चस्वानंतर जावळी पंचायत समितीच्या सभापतिपदी कोण बसणार? याची उत्सुकता जावळीकरांना लागली आहे. जावळी पंचायत समितीचे सभापतिपद हे खुल्या प्रवर्गातील महिला पदासाठी राखीव असून, तालुक्यात म्हसवे गण व सायगाव गण हे खुल्या प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव होते. याठिकाणी म्हसवे गणातून अरुणा शिर्के व सायगाव गणातून जयश्री गिरी या विजयी झाल्या आहेत. या दोघी दावेदार राहणार आहेत.
जावळी पंचायत समितीच्या कार्यकर्त्यांत महिला सदस्याला सभापतिपदाचा मान अनेकदा मिळाला आहे. असे असले तरीही कुडाळ विभागातील महिलेला पूर्णवेळ प्रथमच सभापतिपदाची संधी मिळणार असल्याने अरुणा शिर्के व जयश्री गिरी या दोघीही खुल्या प्रवर्गातून विजयी झाल्याने सभापती कोण होणार हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. सभापती निवडीच्या कारणाने जावळीच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘दादा-गिरी’ यशस्वी ठरणार की अरुणा शिर्केंचा शिरकाव होणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असले तरीही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचे स्पष्ट आहे.
जावळी पंचायत समितीचे सभापतिपद हे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी आरक्षित आहे. तालुक्यातील सहापैकी दोन गण त्यासाठी आरक्षित होते. यामध्ये म्हसवे व सायगाव गण होते. यापैकी म्हसवे गणातून राष्ट्रवादीने अरुणा शिर्के यांना संधी देऊन विजयी केले. तर सायगाव गण हा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून, देखील राष्ट्रवादीने जावळी पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी यांच्या पत्नी जयश्री गिरी यांना उमेदवारी देऊन विजयी केले. त्यामुळे शिर्के यांच्याबरोबरीनेच गिरी या पण जावळी पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या दावेदार ठरू शकतात.
तालुक्यात सध्या आमदार शशिकांत शिंदे यांच्यापेक्षा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा गट प्रभावी राहिला आहे. तालुक्यात कुडाळ विभाग, मेढा विभाग व बामणोली विभाग असून, सभापतिपदासाठी या तीनही विभागांत थोड्या फार प्रमाणात स्पर्धा असते. एका विभागाला सभापतिपद तर दुसऱ्या विभागाला उपसभापतिपद देण्याची आजपर्यंतची प्रथा आहे.
मात्र, यावेळी सभापतिपद हे आरक्षणामुळे कुडाळ विभागाला मिळणार यात शंकाच नाही. यामध्ये अरुणा शिर्के व जयश्री गिरी या दोघींच्यात सभापतिपद कोणाला मिळणार ही जावळीकरांच्यात उत्सुकता आहेच. या दोघींपैकी जयश्री गिरी या आरक्षित प्रवर्गातील असल्या तरीही खुल्या प्रवर्गातून निवडून आल्याने त्याही सभापतिपदाच्या दावेदार ठरतात.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या सुहास गिरींच्या पत्नी जयश्री गिरींना संधी द्यायची की अरुणा शिर्केंना याचा निर्णय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच घेणार आहेत.
गेल्यावेळी खुल्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारासाठी आरक्षित असतानाही सुहास गिरी यांना सभापतिपदी बसविण्याची किमया शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. यानंतर सायगाव गण खुल्या प्रवर्गासाठी असूनही जयश्री गिरींना उमेदवारी देऊन निवडून आणण्याचा चमत्कारही झाला. या दोन्ही घटनांनंतर पुन्हा गिरींचा हॅट्ट्रिक होणार काय? याचे उत्तर सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. मात्र, आमदार भोसले यांच्यामुळे चमत्कार घडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.