शिरवळ : अत्याचार करून महिलेला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 08:30 PM2018-10-16T20:30:11+5:302018-10-16T20:32:04+5:30
नवऱ्याला कारागृहातून सोडविण्याचे आमिष दाखवून व मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्तीने अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका युवकाविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार
शिरवळ : नवऱ्याला कारागृहातून सोडविण्याचे आमिष दाखवून व मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्तीने अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका युवकाविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा (पिटांतर्गत) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास जयकुमार सोनावणे (वय २३, रा. धावडवाडी, ता. खंडाळा) असे पिटांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील व मूळची कर्नाटक राज्यातील असलेल्या एका गावातील महिलेच्या पतीविरुद्ध एक वर्षांपूर्वी शिरवळ, लोणंद पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत.
दरम्यान, संबंधित महिलेच्या पतीविरुद्ध सातारा जिल्हा पोलीस दलाने मोक्कांतर्गत कारवाई केलेली आहे. महिलेच्या पतीला केसकामी खंडाळा येथील न्यायालयामध्ये आणले होते. यावेळी न्यायालयीन कामकाज पूर्ण झाल्यानंतर न्यायालयामध्ये ओळख काढत दोन-तीन दिवसांनी विलास सोनावणे याने संबंधित महिलेच्या मोबाईलवर फोन केला. ‘मी न्यायालयातील जामिनाचेच काम करतो. मी तुमच्याच पतीचा नातेवाईक आहे,’ अशी बतावणी केली.
दम्यान, नोव्हेंबर २०१७ मध्ये विलास सोनावणे याने संबंधित महिलेला खंडाळा येथील एका लॉजवर नेत पतीला सोडवायचे असेल तर शरीरसंबंधाची मागणी करत जबरदस्तीने शरीरसंबंध केले. यावेळी विलास सोनावणे याने वारंवार शरीरसंबंध ठेवत पतीला जेलमधून सोडवण्याचे आमिष दाखवत व मुलाला जीवे मारण्याची धमकी व गप्प बसल्याचा गैरफायदा घेत विविध ठिकाणी आॅगस्ट २०१८ पासून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.
महिलेच्या फिर्यादीवरून शिरवळ पोलीस स्टेशनला विलास सोनावणे याच्याविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (पिटांतर्गत) व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने शुक्रवार, दि. १९ आॅक्टोबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे विलास सोनावणे हा खंडाळा येथील खंडाळा रेस्क्यू टीममध्ये कार्यरत असल्याचे सांगत आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे अधिक तपास करीत आहेत.