शिरवळ पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांची धिंड, निर्भया पथकाकडूनही कारवाईचा धडाका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 11:28 AM2023-12-22T11:28:17+5:302023-12-22T11:28:27+5:30
शिरवळ : शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्यांना शिरवळ पोलिसांनी दणका दिला असून, अवैध धंदे करणाऱ्या वीस ...
शिरवळ : शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्यांना शिरवळ पोलिसांनी दणका दिला असून, अवैध धंदे करणाऱ्या वीस जणांची शिरवळमधून धिंड काढली. तर दुसरीकडे फलटण उपविभागाअंतर्गत असणाऱ्या निर्भया पथकाकडून कारवाईचा धडाका शिरवळ व परिसरामध्ये करत कारवाईचा डब्बल बार चालू ठेवला आहे. शिरवळ पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांविरुध्द उघडलेल्या धडक कारवाईचा धसका अवैध धंदे करणाऱ्यांनी घेतला आहे.
शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन पंधरा वर्षीय युवतीच्या आत्महत्येच्या प्रकारानंतर शिरवळ पोलिसांनी व फलटण उपविभागाअंतर्गत असणाऱ्या निर्भया पथकाने छेडछाड करणाऱ्या टोळक्यांविरुद्ध तसेच अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले गेले आहे. यावेळी शिरवळ पोलिसांनी गुरुवारी (दि.२१) हातभट्टी दारू विक्री करणारे, मटका व्यावसायिक व सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये संबंधितांची असणारी दहशत मोडीत काढण्याकरिता व नागरिकांत भीतीमुक्त वातावरणनिर्मितीकरिता शिरवळच्या पोलिस पथकाने अवैध धंदे करणाऱ्यांची शिरवळ व परिसरातून मुख्यतः शिरवळ पोलिस स्टेशन परिसर, एस.टी. बसस्थानक परिसर, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शासकीय विश्रामगृह, चावडी चौक, बाजारपेठ, रामेश्वर परिसर अशी धिंड काढली.
शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांबद्दल नागरिकांनी न घाबरता शिरवळ पोलिस स्टेशनला माहिती द्यावी, अवैध धंदे करणाऱ्यांची शिरवळ पोलिस गय करणार नसून, संबंधितांची केवळ धिंड न काढता कडक धोरण अवलंबण्यात येणार आहे. -नवनाथ मदने, पोलिस निरीक्षक, शिरवळ